ग्रामीण मार्गाची होणार दर्जोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:18 AM2021-03-05T04:18:32+5:302021-03-05T04:18:32+5:30
नांदेड तालुक्यातील योजनाबाह्य रस्त्यांना लवकरच ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळणार आहे. जिल्हा परिषदेने नांदेड तालुक्यातील प्रस्तावित नसरतपूर ते वाडी बु. ...
नांदेड तालुक्यातील योजनाबाह्य रस्त्यांना लवकरच ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळणार आहे. जिल्हा परिषदेने नांदेड तालुक्यातील प्रस्तावित नसरतपूर ते वाडी बु. सायाळा पांदण रस्ता, गुरुजी चौक ते काबरानगर रस्ता, कोटीतीर्थ ते गोदावरी नदीपर्यंतचा रस्ता, हस्सापूर ते सुगाव व गोदावरी नदीपर्यंतचा हस्सापूर रस्ता, कोटीतीर्थ ते सुगाव, थुगाव, शिवरस्ता, हस्सापूर ते गोदावरी नदीपर्यंतचा रस्ता, नसरतपूर ते कला मंदिरकडे जाणारा रस्ता आणि कोटीतीर्थ ते सुगाव, बोरगाव असे १८.५० किलोमीटरच्या योजनाबाह्य ९ रस्त्यांना रस्ते विकास योजनेत समाविष्ट करावे, असा ठराव सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. याबाबत औरंगाबाद येथील प्रादेशिक विभाग, सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता यांनी नांदेड तालुक्यातील हे योजनाबाह्य रस्ते रस्ते विकास योजना २००१-२०२१ मध्ये समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. जिल्हा परिषदेचा ठराव आणि मुख्य अभियंत्यांचा प्रस्ताव विचारात घेऊन या ९ रस्त्यांना सार्वजिनक बांधकाम विभाग मंत्रालयाने ग्रामीण मार्गाचा दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे. या १८.५० किलोमीटरच्या नवीन रस्त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग रस्त्याची लांबी २०८३.८४ किलोमीटर एवढी होणार आहे. शहरालगतच असलेल्या ग्रामीण भागातील या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली होती. आता या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.