भरधाव खाजगी बस दुभाजक ओलांडून ट्रक, जीपवर धडकली; दैवबलवत्तर म्हणून सर्व सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 15:06 IST2022-08-25T15:05:48+5:302022-08-25T15:06:12+5:30
अपघातानंतर बसमधील सर्व प्रवासी इतर वाहनाद्वारे पुढे रवाना झाली

भरधाव खाजगी बस दुभाजक ओलांडून ट्रक, जीपवर धडकली; दैवबलवत्तर म्हणून सर्व सुखरूप
हदगाव ( नांदेड) : हदगाव-नांदेड रोडवरील मनाठा पाटीजवळ आह पहाटे ३ वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. खाजगी बस रस्ता दुभाजक पार करून एका ट्रक आणि जीपवर धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, मनाठा पाटीजवळ एक भरधाव खाजगी बस ( एमएच ४० एटी ०३४९) दुभाजक पारकरून विरुद्ध बाजूला आली. यावेळी त्याबाजूने जाणाऱ्या जीप आणि एका ट्रकला बसने धडक दिली. अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, यात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ट्रकमधील ( एमएच २६ ए.डी ०५४३ ) कांद्याची पोतेसुध्दा रस्त्यावर पडल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
दरम्यान, अपघातानंतर बसमधील सर्व प्रवासी इतर वाहनाद्वारे पुढे रवाना झाली. यात केवळ एकास पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती मनाठा स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी दिली.