'मी किती जणांचा सांभाळ करू', म्हणत निर्दयी पित्याने २५ दिवसांच्या बालिकेचा केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 06:47 PM2024-08-05T18:47:12+5:302024-08-05T18:47:44+5:30
मृतदेह पिशवीत घालून नदीत फेकणाऱ्या या निर्दयी पित्यास देगलूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- शेख शब्बीर
देगलूर: मी किती जणांचा सांभाळ करू, असे म्हणत पित्यानेच अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या एका २५ दिवसीय निरागस बालिकेचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लेंडी नदीच्या पुलावरून फेकून दिला. या निर्दयी पित्यास देगलूर पोलिसांनी सोमवारी सकाळी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी शेषेराव सुदाम भुरे ( मूळ राहणार चाकूर हल्ली मुक्काम फुलेनगर देगलूर ) हा मोंढ्यात हमालीचे काम करतो. आरोपी भुरेला पहिल्या पत्नीपासून दोन मुली व एक मुलगा आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यामुळे एक मुलगा व एक मुलगी यांना सोबत घेऊन राहणाऱ्या गावातीलच एका विधवा महिलेशी भुरेचे प्रेम संबंध जुळले. याची कुणकुण महिलेच्या नातेवाईकांना लागल्याने आरोपी सदरील महिलेस तिच्या मुलांना घेऊन शहरातील फुलेनगर येथे भाड्याच्या घरात राहू लागला.
दरम्यान, ती महिला गर्भवती राहिली असता भुरे याने गर्भपात करण्यासाठी मारहाण करत दबाव टाकला. मात्र, महिलेने ११ जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर भुरे याने बाळाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी महिलेस दिली. २ ऑगस्ट रोजी महिला, त्याची तीन मुले घरात झोपलेली होती. यावेळी 3 ऑगस्ट रोजी पहाटे २:३० वाजेच्या सुमारास भुरेने २५ दिवसाच्या गोंडस बाळाचा गळा दाबून खून केला. तसेच मृतदेह एका थैलीत टाकून बागन टाकळी जवळील लेंडी नदीच्या पुलावरून फेकून दिले. हा सर्व प्रकार कोणाला सांगितल्यास तुलाही मारून टाकतो, अशी धमकी महिलेला भुरे याने दिली.
रविवारी ( दि. ४ ) संध्याकाळच्या सुमारास बागन टाकळीजवळील लेंडी नदीच्या पात्रात एका स्त्री जातीचे नवजात अर्भकाचा मृतदेह असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीकडून देगलूर पोलीसांना मिळाली. देगलूर पोलीसांनी लागलीच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. लागलीच देगलूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून निर्दयी पिता शेषेराव सुदाम भुरे यास सोमवारी सकाळी गजाआड केले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे हे करीत आहेत.