एस. टी. भाडेवाढीच्या झळा विद्यार्थ्यांनाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:41 AM2018-06-20T00:41:43+5:302018-06-20T00:41:43+5:30
नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झळा सहन कराव्यात लागत असून वाढत्या महागाईबरोबरच पालकांना आता विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : इतर खर्चाबरोबर वाढत्या इंधनदरामुळे राज्य परिवहन महामंडळाने १८ टक्के दरवाढ केली. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. या दरवाढीचा नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झळा सहन कराव्यात लागत असून वाढत्या महागाईबरोबरच पालकांना आता विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून सर्वसामान्य नागरिकांसोबतच शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांसाठी प्रवास करतात. महामंडळाने मानव विकास योजनेतून मुदखेड तालुक्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी निळ्या रंगाच्या ७ विशेष गाड्या असून सुमारे साडेतीनशे विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेतात. तर अहिल्यादेवी होळकर योजनेतून पाचवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे ९०० विद्यार्थिनी मोफत प्रवास लाभ घेऊन आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत.
मात्र या दोन्ही योजनेत न बसणाऱ्या विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांचे शाळा-महाविद्यालयांसाठीच्या प्रवासाची मदार सवलतीच्या दरात असलेल्या पास योजनेवर आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली नवी दरवाढ या सवलतीच्या पाससाठीही लागू असल्याने नांदेड शहरातील दोन हजार तर ग्रामीण भागातील साडेतीन हजार अशा साडेपाच ते सहा विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. महागाईमुळे सर्वसामान्य पालक त्रस्त असताना आता पालकांच्या शिक्षणखर्चातही वाढ होत असल्याने सर्वसामान्यांत संताप व्यक्त होत आहे.
---
‘आवडेल तेथे प्रवास’ ही महागला
राज्य परिवहन महामंडळातर्फे ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना राबविली जाते. ७ व ४ दिवसांचा पास असलेली ही योजना प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. साधी जनता सेवा ते शिवशाही अशा सर्वच गाड्यांसाठी या योजनेतून वेगवेगळ्या दरांमध्ये पास उपलब्ध करुन दिले जातात.१५ आॅक्टोबर ते १४ जून या गर्दीच्या हंगामात दर काहीसे अधिक असतात तर गर्दीचा कमी हंगाम असलेल्या १५ जून ते १४ आॅक्टोबर या कालावधीत कमी दरात पास उपलब्ध होतात. या लोकप्रिय योजनेलाही आता दरवाढीचा फटका बसणार आहे. विशेषत: ‘आवडेल तेथे प्रवास’ हा पास काढून पंढरपूर, आळंदी, गौरी गणपतीसह इतर यात्रेसाठी जाणारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेत होते. या सर्व भाविकांनाही आता या पाससाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
---
शाळा, महाविद्यालयांना आता सुरूवात झाली आहे. नवीन नांदेडातून शहरात दररोज ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. तसेच नांदेड शहरातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विविध संकुलामध्ये जाणाºया विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी विद्यार्थी पासचा मोठा आधार होता. मात्र आता एसटीने इंधन दरवाढीपोटी केलेली १८ टक्के भाडेवाढीचा फटका या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्याचप्रमाणे चाकरमानेही मासिक, त्रैमासिक पासद्वारे ये-जा करीत होते. आता त्यांच्याही खिशाला झळ बसणार आहे.
---
पूर्वीच्या पासधारकांना महामंडळाचा दिलासा
‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेअंतर्गत १५ जूनपूर्वी ज्यांनी पास घेतलेले आहेत. त्यांना १५ जूनपासून चालू होणारी दरवाढ लागू असणार नसून त्यांचे चालू असलेले पास मुदत संपेपर्यंत वैध राहणार असल्याचे नांदेड आगाराच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. १६ जूनपासून नवीन पासेस उपलब्ध होईपर्यंत सध्या वापरात असलेल्या त्या-त्या सेवेच्यावर नमूद केलेल्या पासच्या मूल्यात रबरी शिक्क्यांनी मूल्य परिवर्तन करुन जुन्या पासवरील मूल्य खोडण्यात येणार असून त्या ठिकाणी पासच्या मूल्यात वाढ झाल्यास नवीन पासची छपाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या पासवर रबरी शिक्क्यांनी मूल्य बदलून नवीन पास येईपर्यंत वापर करण्यात येणार असल्याचेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.