सचखंड २७ तास उशिराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:32 PM2018-01-07T23:32:53+5:302018-01-07T23:33:07+5:30
उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ नांदेडकडे येणारी सचखंड एक्स्प्रेस, श्रीगंगानगर एक्स्प्रेस मागील काही दिवसांत अनेकवेळा निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावली़ शनिवारी नांदेडात पोहोचणारी अमृतसर-नांदेड (१२७१६) सचखंड एक्स्प्रेस तब्बल २७ तास उशिराने धावत असून रविवारी रात्री उशिरापर्यंत गाडी नांदेडात पोहोचली नव्हती़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ नांदेडकडे येणारी सचखंड एक्स्प्रेस, श्रीगंगानगर एक्स्प्रेस मागील काही दिवसांत अनेकवेळा निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावली़ शनिवारी नांदेडात पोहोचणारी अमृतसर-नांदेड (१२७१६) सचखंड एक्स्प्रेस तब्बल २७ तास उशिराने धावत असून रविवारी रात्री उशिरापर्यंत गाडी नांदेडात पोहोचली नव्हती़
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे़ त्यामुळे निर्माण झालेल्या धुक्याचा परिणाम गाड्यांवर होत असून उत्तर भारतातून धावणाºया सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत़ दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून उत्तर भारतात धावणारी श्रीगंगानगर एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस औरंगाबाद मार्गे आणि अकोलामार्गे या तीनही गाड्या उशिराने धावत आहेत़ त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे़ शनिवारी सचखंड एक्स्प्रेस रद्द झाल्याने रविवारी नांदेडहून अमृतसरसाठी रवाना झालेल्या सचखंड एक्स्प्रेसला मोठी गर्दी झाली होती़ ज्या प्रवाशांना गाडीमध्ये जागा मिळाली नाही़ त्यांनी मिळेल त्या गाडीने पुणे, औरंगाबाद आणि मनमाडपर्यंत प्रवास करणे पसंत केले़ परंतु, गाडी रद्द झाल्याने आणि उशिराने धावत असल्याने हजारो प्रवाशांच्या टूरच्या नियोजनावर पाणी फेरले आहे़ श्री सचखंड गुरूद्वारा दर्शनासाठी दिल्ली, पंजाब, अमृतसर या भागातून येणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे़ नववर्षानिमित्त दर्शनासाठी लाखो भाविक नांदेडात दाखल झाले़ भाविकांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे़ परंतु, ऐनवेळी गाड्या रद्द व काही गाड्या उशिराने धावत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे़
श्रीगंगानगर एक्स्प्रेस उशिराने सुटणार
नांदेड येथून श्रीगंगानगरसाठी जाणारी श्रीगंगानगर एक्स्प्रेस रविवारी उशिराने सुटली़ त्यानंतर सोमवारी सुटणारी गाडीसंख्या १२४८६ नांदेड - श्रीगंगानगर एक्स्प्रेस ८ जानेवारी रोजी निर्धारित वेळेपेक्षा ११ तास उशिराने म्हणजेच रात्री १० वाजता सुटणार आहे़