संकटात सापडलेल्या सैनिकाच्या मुलीस साई प्रसाद सेवापरिवाराने दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:13 AM2020-12-09T04:13:48+5:302020-12-09T04:13:48+5:30

याबाबत थोडक्यात वृत्त असे की, सैनिकाची रणरागिणी कन्या दीपमाला व संतोष दिकोंडावार या दोघांचा विवाह २००२ मध्ये झाला. टेलरिंगच्या ...

Sai Prasad Seva Parivar gave support to the daughter of a soldier found in distress | संकटात सापडलेल्या सैनिकाच्या मुलीस साई प्रसाद सेवापरिवाराने दिला आधार

संकटात सापडलेल्या सैनिकाच्या मुलीस साई प्रसाद सेवापरिवाराने दिला आधार

Next

याबाबत थोडक्यात वृत्त असे की, सैनिकाची रणरागिणी कन्या दीपमाला व संतोष दिकोंडावार या दोघांचा विवाह २००२ मध्ये झाला. टेलरिंगच्या व्यवसायात दोघेही स्पेशलिस्ट होते. त्यांना तीन मुले असून ते दहावी, आठवी व पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहेत. पाच वर्षांपूर्वी पती संतोष यास कावीळ झाल्याचे समजल्याने दीपमालाचे वडील चंदीगड येथे सैन्यात असल्याने तेथील हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता त्यांची एक किडनी लहान व मोठी किडनी निकामी झाल्याचे समजले. तेव्हापासून या रणरागिणीने एकटीचा टेलरिंगच्या मजुरीवर तीन मुलांचे शिक्षण, संसाराचा खर्च, लाईट बिल, घर किराया, पतीच्या औषधाचा खर्च, महिन्यातून एक वेळा तरी रक्त चढविणे, असा खर्च चालविला. यात तिचा जीव मेटाकुटीला आला होता.

अशा कठीण संकटातून संसार चालवीत असताना कोरोना काळात धर्माबाद ते नांदेड शंभर किलोमीटरचे अंतर डायलिसिस करण्यासाठी बाहेर निघण्याशिवाय पर्याय नसल्याने दहावीतील मुलाला मोटारसायकल शिकवली. दोनशे किलोमीटर येणे-जाणे करून तो थकून जात असे. काम बंद झाल्याने, टेलरिंगचा व्यवसायही बंद झाला व कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ लागली. ही व्यथा तिने पत्रकारांना सांगितली. ते मीडिया व व्हाॅटस्‌ॲप, फेसबुक माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्याने सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन मालू यांनी घरी येऊन विचारपूस करून मदतीचे आश्वासन दिले.

गोवर्धन मालू यांनी साईप्रसाद सेवा परिवाराकडे दीपमालाची कहाणी सांगितली असता उपचारासाठी आतापर्यंत ३७ हजार रुपयांची मदत केली असून, टेलरिंग व्यवसायासाठी मदत करण्याचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने कुटुंबाला आधार मिळाला. दीपमाला व संतोष दिकोंडवार यांनी आभार मानले.

धर्माबाद येथील दानशूर लोकांकडून महिन्यातून दोन वेळा रक्तपुरवठ्यासाठी लागणारी रक्कम देण्यासाठी काही लोकांकडे शब्द टाकला असता अनेक लोकांनी सहकार्य करण्याची हमी दिली. याची सुरुवात प्रथम गोवर्धन मालू यांनी स्वतःचे पैसे देऊन केली, मार्केट कमिटीचे उपसभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर, पत्रकार जी.पी. मिसाळे यांनीही एक पिशवी रक्त देऊन सहकार्य केले आहे.

सैनिकाच्या कुटुंबावर आलेले संकट दूर करण्यासाठी देशभक्तीची नीती असणारे या कुटुंबाला आधार देत असल्याबद्दल त्यांनी या दानशूरांचे आभार मानले. विसकटलेल्या संसाराची घडी बसण्यासाठी समाजबांधव, दानशूर लोकांनी सहकार्य करावे, अशी विनंती सैनिक कन्या दीपमाला संतोष दिकोंडावार यांनी केली आहे.

Web Title: Sai Prasad Seva Parivar gave support to the daughter of a soldier found in distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.