नांदेड केंद्रातून राष्ट्रभक्ती रूजवणाऱ्या साडेआठ हजार तिरंगा ध्वजांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:59 PM2019-08-13T12:59:08+5:302019-08-13T13:07:19+5:30
शासनाकडून राजाश्रयाची प्रतीक्षा
कंधार (जि. नांदेड) : नांदेड येथील खादी ग्रामोद्योग केंद्रातून राष्ट्रभक्ती देशभर रूजवणाऱ्या विविध आकारातील ८ हजार ६६८ तिरंगा ध्वजांची विक्री यंदा झाली आहे. वर्षानुवर्षे तुटपुंज्या मजुरीवर येथील कामगार देशप्रेमापोटी अथक परिश्रम घेऊन राष्ट्रध्वज तयार करतात. अशा कारागिरांना शासनाने राजाश्रय देण्याची गरज असल्याचे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती, नांदेडचे सचिव तथा माजी आ. ईश्वरराव भोसीकर यांनी लोकमतला सांगितले.
मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती, नांदेडने दक्षिण भारतातच नव्हे तर देशात आपल्या खादी उत्पादनाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कंधार केंद्रातील सतरंजी व आसनपटी, औसा येथील धोतर, अक्कलकोट येथील मसलीन कापड, उदगीर येथील तिरंगा ध्वजासाठीचे सूत व कापड आणि नांदेड येथे संपूर्ण ध्वजाची परिपूर्ण निर्मिती अशांनी ही सर्व केंद्र आपली वैशिष्ट्ये जतन करून आहेत.
नांदेड येथे सुतापूर्वीचा 'पेळू 'मागवला जातो. हा पेळू उदगीर येथील केंद्रात पाठवला जातो.उदगीर येथे सूत कताई करून कपडा तयार केला जातो. येथील मजूर गत अनेक वर्षांपासून मोठ्या निष्ठेने हे काम करतात. महिलांचे यात मोठे योगदान आहे.परंतु मोबदला मात्र तुटपुंजा मिळतो. उदगीर केंद्रात सूतापासून तयार केलेला कपडा नांदेड येथे येतो. आणि कपडा धुलाई व रंगाईसाठी अहमदाबादला पाठवला जातो. तेथून परत तो नांदेडला येतो. कपडा गुणवत्ता तपासणी नांदेड प्रयोगशाळेत होते. योग्य कपडा हा ध्वज आकारा प्रमाणे कटींग करून विविध पट्या तयार केल्या जातात. एक बाय दीड फुट ते चौदा बाय एकवीस फूटापर्यंतचे अशा आठ आकारातील ध्वज तयार केले जातात. अशोकचक्र हे ध्वज आकारावरून तयार केले जाते. गरडी (लाकडी ठोकळा), शिलाई साठी सहा जणावर भार आहे.
या प्रक्रियेतील केंद्रीय खादी वस्त्रागार महाबळेश्वर मठपती यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. नांदेड येथील राष्ट्रध्वज निर्मिती प्रमुख सुरेश जोशी हे नियमानुसार निर्मिती झाली की नाही याची तपासणी करतात. या वर्षी २५ हजार ३८० राष्ट्रध्वज तयार केले असल्याचे सांगण्यात आले. २ बाय ३ फूट आकाराच्या ध्वजाला मोठी मागणी देशभर आहे. हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरांचल आदी राज्यात नांदेडचा तिरंगा ध्वज पाठविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. ११ आॅगस्टपर्यंत ८ हजार ६६८ ध्वजाची विक्री झाली आहे. सुमारे ८० लाखाची ही विक्री १४ आॅगस्ट पर्यंत त्यात १० ते १५ लाखाची भर पडण्याची शक्यता असल्याचे माजी आ.भोसीकर यांनी सांगितले.
कामगार, विणकरांना अनुदान द्या
खादी ग्रामोद्योग आयोगातंर्गत ही संस्था चालते. महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु यांनी अनुक्रमे अध्यक्ष व सचिव म्हणून आयोगाची धुरा सांभाळली. वस्त्र स्वावलंबनासाठीची चळवळ होती. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात भाग भाडंवल बिनव्याजी मिळत होते. बँकेकडून कर्ज घेऊन संस्था चालते. शासनाने थेट अनुदान द्यावे. संस्थेचे कर्ज माफ करावे. खादीचे उत्पादीत कापड शासनाने खरेदी करावे. केंद्र-राज्य कर्मचाऱ्यांना एक गणवेश खरेदी करण्याचे अनिवार्य करणारा जी.आर.काढावा. कामगारांना, विणकरांना थेट अनुदान द्यावे. त्यामुळे संस्थेला, श्रमिकांना बळकटी मिळेल. संस्थेला वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी अध्यक्ष नागोराव देशपांडे, उपाध्यक्ष वसंत नागदे आदीचे मोठे योगदान असल्याची माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती सचिव, नांदेडचे ईश्वरराव भोसीकर यांनी दिली.
आय. एस. ओ. मानांकन
मराठवाडा खादी ग्रामोद्योग केंद्र आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी प्रसिद्ध आहे. देशातील सर्वश्रेष्ठ खादी क्लस्टर पुरस्कार प्राप्त, आय.एस.ओ.मानांकन, तिरंगा ध्वज तयार करणारी, खादी ग्रामोद्योग आयोगाकडून अ + कॅटेगरी प्राप्त, आठ जिल्ह्यात महिला कारागिरांना रोजगार देणारी ही संस्था आहे. परंतु नानाविध समस्येचा सामना करावा लागत आहे. कामगारांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. शासनाने राजाश्रय देण्याची आवश्यकता आहे.