मराठवाड्याच्या दळणवळणाला मिळणार गती; नांदेडसह परभणी, हिंगोलीलाही आता समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 07:38 PM2021-01-15T19:38:50+5:302021-01-15T19:43:24+5:30
Samruddhi Mahamarg साडेसहा हजार कोटींच्या प्रकल्पाला तत्वत मंजुरी मिळाल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
नांदेड - हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी आता नांदेडबरोबरच परभणी, हिंगोलीही जोडले जाणार आहे. सुमारे साडेसहा हजार रुपये कोटी रुपयाच्या या प्रकल्पाला राज्य शासनाने तत्वत मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला तात्विक मान्यता दिल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे या तिन्ही जिल्ह्यातील दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.
याबाबत अशोक चव्हाण यांनी सांगितले की मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला नांदेड शहर जोडले जावे यासाठी मागील काही महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू होता. गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे समृद्धी महामार्गावरील जालना टी पॉईंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रुतगती महामार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्यासह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यालाही समृद्धी महामार्गाशी थेट आणि वेगवान कनेक्टीव्हीटी मिळेल. तसेच नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद या प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होईल असे त्यांनी सांगितले.
जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी १९४ कि.मी. असून त्यासाठी अंदाजित खर्च ५ हजार ५०० कोटी रुपये अपेक्षित आहे. या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठीचा तांत्रिक, अभियांत्रिकी व वित्तीय सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामालाही गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. नव्या निर्णयानुसार समृद्धी महामार्ग मुंबईच्या दिशेला जेएनपीटीशी जोडला जाणार आहे. त्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली हे जिल्हे आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याच्या दृष्टीनेही महामार्गाशी जोडले जातील. नांदेड-जालना या समृद्धी महामार्गाच्या कनेक्टींग लिंकचा भाग म्हणून नांदेड शहरातही रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नांदेड शहरातील हिंगोली गेट-बाफना चौक-देगलूर नाका ते छत्रपती चौक (धनेगाव जंक्शन) या रस्त्याची सुधारणा याद्वारे करण्यात येईल. उड्डाणपूलासह देगलूर नाक्यानजीक गोदावरी नदीवर पूलही उभारला जाईल. महामार्गाच्या प्रकल्पाचा भाग म्हणूनच ही कामे करण्यास बैठकीत तत्वत मंजुरी मिळाली आहे. या कामांसाठी साधारण १ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे नांदेड शहरातील या नवीन रस्त्यांचा व पुलाचा वापर करण्यासाठी नांदेडकरांना कुठल्याही प्रकारचा टोल द्यावा लागणार नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या विकासाला मिळेल चालना
समृद्धी महामार्ग नांदेडशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील मोठ्या भागात दळणवळण अधिक सुलभ होईल. नांदेड ते मुंबई व औरंगाबाद या महत्त्वाच्या मार्गावरील प्रवासात वेळ व पैशाची बचत होईल. याबरोबरच मालवाहतुकीच्या दृष्टीनेही हा निर्णय मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या तिन्ही जिल्ह्यांना जेएनपीटीपर्यंत थेट कनेक्टीव्हीटी मिळेल. त्यामुळे व्यावसायाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन एकूणच मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल.
- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री.