नांदेडमधील दलित वस्तीतील कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:32 AM2018-07-05T00:32:32+5:302018-07-05T00:33:11+5:30
दलित वस्तीअंतर्गत शहरातील दोन कोटींच्या कामांना बुधवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सव्वाकोटी रुपयांच्या मोफत पिशवी वाटप करण्याच्या उपक्रमाच्या तीन निविदाही मंजूर करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दलित वस्तीअंतर्गत शहरातील दोन कोटींच्या कामांना बुधवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सव्वाकोटी रुपयांच्या मोफत पिशवी वाटप करण्याच्या उपक्रमाच्या तीन निविदाही मंजूर करण्यात आल्या आहेत.
स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आयुक्त लहुराज माळी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, समिती सदस्य अब्दुल सत्तार, किशोर स्वामी, मसूद खान, उमेश पवळे, भानुसिंह रावत आदींची उपस्थिती होती. स्थायी समितीपुढे एकूण १२ विषय ठेवण्यात आले होते. यामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्र. ७ मध्ये जयभीमनगर भागात नरसिंह विद्यामंदिरच्या जागेतून नाला बांधकामाच्या कामास मंजुरी देण्यात आली. सदर कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील अंदाजपत्रकीय दराची ६६ लाख ६७ हजार रुपयांची स्वास्तिक कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली. त्याचवेळी श्रावस्तीनगर भागातही दलित वस्ती निधीतून ड्रेनेज लाईन टाकून नाल्याचे बांधकाम करण्यासाठी ९८ लाख रुपये प्राप्त झाले होते.
या कामासाठीही अंदाजपत्रकीय दराची स्वान कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली. श्रावस्तीनगरमध्येच रस्ता कामासाठी ३१ लाख ३८ हजार ६०० रुपये दलित वस्ती निधीतून मिळाले आहेत. या कामासाठी अंदाजपत्रकीय दरापेक्षा ०.९९ दर प्राप्त झाला आहे. हे काम स्वस्तिक कन्स्ट्रक्शनला देण्यात आले.
पालकमंत्री रामदास कदम यांच्या संकल्पनेतून शहरात प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी सव्वाकोटी रुपये निधी जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आला आहे. या मोफत पिशवी वाटपाच्याही तीन वेगवेगळ्या निविदा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिशव्यांसाठी कपड्याचा पुरवठा करणे, कापडी पिशव्या शिवून देणे आणि त्या कापडी पिशव्यावर स्क्रिन प्रिंटिंग करणे अशा तीन निविदा आहेत. त्या निविदांनाही मंजुरी दिली आहे. या तिन्ही कामासाठी एक कोटी रुपये खर्च होणार असून २५ लाख वेगळ्याने बॅनरसाठी खर्च केले जाणार आहेत. महापालिकेच्या विविध विभागातंर्गत सुरक्षा कक्ष नियुक्त करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या निविदांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
प्रभारी उपअभियंता मनोहर दंडे यांचा पुनर्विलोकन अर्जही स्थायी समितीने मंजूर केला आहे. याच सभेत शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग खरेदी करण्याच्या निविदेसह मंजुरी देण्यात आली.
बैठकीस अ. लतिफ लोखंडवाला, शेर अली, सतीश देशमुख, प्रशांत तिडके, मोहिनी येवनकर, कांताबाई मुथा, ज्योत्स्ना गोडबोले, वैशाली देशमुख, उपायुक्त माधवी मारकड, संतोष कंदेवाड, नगरससचिव अजितपालसिंघ संधू, शहर अभियंता गिरीष कदम, विलास भोसीकर आदींची उपस्थिती होती.