‘संघा’ला प्रश्न विचारता, ‘एमआयएम’ला का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:28 AM2018-11-25T00:28:30+5:302018-11-25T00:32:45+5:30

आज एमआयएम हा हैदराबादेतील पक्ष महाराष्ट्रात रुजतो आहे. याच पक्षाने हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याला एकेकाळी विरोध केला होता. त्यामुळे आरएसएसप्रमाणेच या लढ्यासंबंधी एमआयएमला प्रश्न का विचारत नाही?

'Sangha' asks the question, why not 'MIM'? | ‘संघा’ला प्रश्न विचारता, ‘एमआयएम’ला का नाही?

‘संघा’ला प्रश्न विचारता, ‘एमआयएम’ला का नाही?

Next
ठळक मुद्देजयदेव डोळे यांचा सवाल हैदराबाद मुक्तिसंग्रामाची मांडली शौर्यगाथा

नांदेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ना स्वातंत्र्य चळवळीत होता, ना हैदराबाद मुक्तिलढ्यात. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्य चळवळीवेळी तुम्ही कुठे होता? असा प्रश्न विचारला जातो. आज एमआयएम हा हैदराबादेतील पक्ष महाराष्ट्रात रुजतो आहे. याच पक्षाने हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याला एकेकाळी विरोध केला होता. त्यामुळे आरएसएसप्रमाणेच या लढ्यासंबंधी एमआयएमला प्रश्न का विचारत नाही? असा परखड सवाल ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी उपस्थित केला.
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानींच्या शौर्यगाथा ज्ञात, अज्ञात बलिदान केलेल्या लोकांचा परिचय व्हावा, या हेतूने बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन लातूर यांच्या वतीने शनिवारी रात्री येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ‘मराठवाडा मुक्तिगाथा’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण होते. यावेळी मंचावर आ. डी. पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, डॉ. तसनीम पटेल, माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे, सदाशिवराव पाटील, मनोहर गोमारे, डी. आर. पाटील, धनंजय पाटील, दिलीप पाटील, जी. टी. जाधव, शंतनू डोईफोडे आदींची उपस्थिती होती.
आजकाल कुठल्याही ऐतिहासिक घटनेचे आपल्या विचारधारेप्रमाणे विकृतीकरण करण्याची स्पर्धा लागली आहे. मात्र हैदराबाद मुक्तिलढ्याचा इतिहास अद्यापही विकृत झालेला नाही. कारण या लढ्याचे वारसदार जागरुक आहेत. निजामाविरुद्धचा हैदराबाद मुक्तिसंग्राम हा मराठीसोबतच कानडी आणि तेलगू भाषिक लढा होता. त्यामुळे या लढ्यात निजामाविरोधात विरोधक एकसंघ नव्हते. मात्र त्याही परिस्थितीत लबाड आणि अन्यायकारक कारभार करणाऱ्या निजामाला जनतेने एकत्रित येऊन धडा शिकविला. हा इतिहास सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे. त्यामुळेच १५ आॅगस्ट १९४७ ही भारतीय स्वातंत्र्यदिनाची तारीख आपण जशी लक्षात ठेवतो, तशीच १७ सप्टेंबर १९४८ ही हैदराबाद मुक्तिसंग्रामाची तारीखही लक्षात ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
हैदराबाद मुक्तिलढा हा स्वामी रामानंद तीर्थ या संन्याशाचा निजामासारख्या धूर्त राजकारण्यांसोबतचा लढा होता. ज्या निजामाने वंदे मातरम्ला बंदी घातली, मराठी भाषेला बंदी घालत येथील जनतेवर अन्याय-अत्याचार केले. १९४२ पर्यंत माणुसकीच्या हक्कासाठीच आम्ही निजामाविरोधात भांडत होतो. मात्र १९४२ मध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाविरोधात भारत छोडोची घोषणा केली आणि ते पाहूनच मराठवाड्यात हैदराबाद छोडो असा आवाज निजामाविरोधात उमटला. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या एमआयएम या पक्षाने हैदराबाद मुक्ती लढ्याविरोधात काम केले. अशा विचारधारेला आणि पक्षाला मराठवाड्यात स्थान का देता? असा सवालही प्रा. डोळे यांनी केला.
तत्पूर्वी डॉ. तसनीम पटेल यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाची गाथा सांगितली. या लढ्यामागे वैचारिक भूमिका असल्याचे सांगत तो लढा केवळ हिंदू अस्मितेचा अथवा मुस्लिम द्वेषाचा नव्हता, तर नाकारलेल्या मानवी स्वातंत्र्याविरुद्धचा होता. सत्तेच्या नशेत धुंद झाल्यानंतर निजाम आणि त्याचा हस्तक कासीम रिझवी यांनी मराठवाड्यातील जनतेवर जे अत्याचार केले त्याला इथल्या जनतेने दिलेले ते प्रत्युत्तर होते, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.
१७ सप्टेंबर १९४८ ला रझाकारासोबत अशाच लोकांची घरे जाळली गेली, जे निजामाच्या जुलमी राजवटीला मदत करीत होते. निजाम गेल्यानंतरच मराठवाड्यात शिक्षणाची कवाडे खुली होऊन प्रगतीची दिशा मिळाली. त्यामुळे निजामाने मराठवाड्याला काय दिले? याचाही विचार मुस्लिम समाजाने करायला हवा, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला नांदेड शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
नव्या पिढीने समजून घ्यावा मुक्तिसंग्राम लढा
अत्यंत विपरित परिस्थितीत बलाढ्य निजामाशी मराठवाड्याने लढा दिला. हा लढा इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वत:चे बलिदान देवून मराठवाडा आणि महाराष्टÑ घडविला. त्यांचे बलिदान व्यर्थ जावू देणार का ? असा सवाल करीत नव्या पिढीपर्यंत हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचा इतिहास पोहोचला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. मराठवाडा आणि महाराष्टÑाला गौरवशाली इतिहास असताना मराठवाड्याचे विभाजन करण्याची भाषा कशी काय केली जावू शकते? असा प्रश्न करीत मराठवाड्याचे निश्चित प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण महाराष्ट्रात राहूनच सोडवू. मात्र मराठवाडा तोडण्याची भूमिका कुठल्याही परिस्थितीत निषेधार्हच असल्याचे त्यांनी सांगितले. निजामाच्याच मार्गदर्शनाखाली एमआयएमची स्थापना झाली.ही विषवल्ली छाटण्यासाठी आम्ही कालही लढलो आणि यापुढेही लढत राहू, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: 'Sangha' asks the question, why not 'MIM'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.