Biyani Murder Case:..अन् ५ सेकंदांतच खेळ खल्लास; 'एसआयटी' घेणार मारेकऱ्यांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 03:57 PM2022-04-06T15:57:15+5:302022-04-06T15:59:24+5:30
Sanjay Biyani Murder Case: बिल्डर संजय बियाणी खून प्रकरण : सुपारी देऊन खून केल्याचा पोलिसांचा संशय, घटनास्थळी सापडलेली गोळी विदेशी
नांदेड : येथील प्रख्यात बिल्डर तथा बांधकाम व्यावसायिक संजय बालाप्रसाद बियाणी (५१, रा. शारदानगर, नांदेड) यांचा मंगळवारी भरदिवसा गाेळ्या झाडून खून केला (Sanjay Biyani Murder Case) असून आरोपींच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी एसआयटीची (विशेष तपास पथक) स्थापना केली आहे.
बिल्डर संजय बियाणी मंगळवारी सकाळी एका राजकीय नेत्याची भेट घेऊन आपल्या शारदानगर स्थित घरी पाेहाेचले. यावेळी कारमधून उतरत असताना त्या भागात आधीच दबा धरून बसलेले दाेनजण दुचाकी वाहनावरून तेथे आले. त्यांनी बियाणी यांच्या दिशेने बेछूट गाेळीबार केला. छातीत व मानेत गाेळी शिरल्याने बियाणी यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा चालक रवी सुरेश सावंत (३५, रा. राजनगर, नांदेड) हा खांद्यावर गाेळी लागल्याने गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी पाेलिसांना एक जिवंत काडतूस आढळले. हे काडतूस विदेशी बनावटीच्या पिस्टलमध्ये वापरले जाते. त्यामुळे मारेकरी स्थानिक नसून बाहेरील असावे, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे. बियाणी यांच्या खुनामागे खंडणी, राजकारण, व्यावसायिक स्पर्धा, रियल इस्टेटमधील गुंतवणूक, त्यातील वाद यापैकी एखादे कारण आहे का, की आणखी वेगळ्या कुण्या कारणासाठी हा थरार घडविला गेला, यादृष्टीने पाेलीस तपास करीत आहेत. पाेलिसांनी मारेकऱ्यांच्या शोधार्थ पाच पथके गठित केली आहेत. यापूर्वी खंडणी मागणाऱ्या कुख्यात रिंधा टाेळीच्या सदस्यांवरही लक्ष्य केंद्रित केले आहे. शिवाय सध्या कारागृहात असलेल्या इतरही गुंडांची चाैकशी केली जात आहे. या घटनेनंतर आनंदनगर परिसरात झालेल्या दगडफेकीत एका दुकानाच्या काचा फुटल्या. मारेकरी दाेन दिसत असले तरी पडद्यामागे आणखी काेण काेण आहेत, सुपारी देऊन तर हा खून केला गेला नाही ना, यादृष्टीनेही पाेलीस तपास करीत आहेत. या प्रकरणी विमानतळ पाेलिसांनी अज्ञात दाेन मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नाेंदविला आहे. गाेळीबारानंतर बियाणी यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना मृत घोषित केल्यानं बंधू प्रवीण अन् कुटुंबाने हंबरडा फोडला..
माेठ्या शहरात जाण्याचे स्वप्न राहिले अर्ध्यावरच
नांदेडात बांधकाम व्यवसायात चांगला जम बसल्यानंतर बियाणी यांनी मागील वर्षीच मोठ्या शहरात जाऊन स्थायिक होण्याचा विचार केला होता. मित्रांसोबतही नेहमी ते नांदेड सोडण्याचा विचार बोलून दाखवित होते. त्याच उद्देशाने त्यांनी पुणे आणि मुंबई येथे काही गुंतवणूक केली होती. परंतु तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे मोठ्या शहरात जाण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.
आज ‘नांदेड शहर बदं’चे व्यापाऱ्यांचे आवाहन
बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व व्यापारी संघटनांनी बुधवार, ६ एप्रिल रोजी नांदेड शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बियाणी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. संजय यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता येथे गोवर्धन घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
एसआयटीचे नेतृत्व ‘ॲडिशनल’कडे
विशेष तपास पथकात नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, लोह्याचे पो. नि. तांबे, लिंबगावचे सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, इतवारा ठाण्याचे गणेश गोठके, हिंगोलीचे गेव्हारे, परभणीचे शिरशेवार आदी आहेत.
कोलंबीवासी आक्रमक, जिल्हाकचेरीत घोषणाबाजी
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येची माहिती मिळताच कोलंबी ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन देत आरोपींना २४ तासात अटक करा अन्यथा बेमुदत उपोषण करू, असा इशारा दिला आहे. यावेळी ग्रामस्थांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. .
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात, आयजी, एसपी घटनास्थळी
पाेलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्याद्वारे मारेकऱ्यांचा काही सुगावा लागताे का, यादृष्टीने शाेध घेतला जात आहे. उपमहानिरीक्षक निसार तांबाेळी, जिल्हा पाेलीस अधीक्षक प्रमाेदकुमार शेवाळे यांनीही ठसे तज्ज्ञांसह घटनास्थळी भेट देऊन तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. घटनेनंतर लगेच शहरात व जिल्हाभर नाकाबंदी करून पाेलीस बंदाेबस्त तैनात केला.
अन् ५ सेकंदांतच खेळ खल्लास
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपींनी केवळ ५ सेकंदांत १२ राऊंड झाडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संजय बियाणी हे ११.१०.५५ वाजता गाडीच्या उजव्या बाजूने खाली उतरून घराच्या गेटकडे निघाले. तेवढ्यात त्यांच्या मागावर असलेले आरोपी दुचाकीवरून आले. बियाणी यांच्या चारचाकीसमोर दुचाकी उभी करून थेट त्यांच्यावर हल्ला चढविला. हा हल्ला ११ वाजून ११ मिनिटांनी सुरू झाला. आरोपींनी पुढील पाच सेकंद त्यांनी सलग गोळ्या झाडल्या. यात संजय बियाणी हे जखमी होऊन जमिनीवर कोसळले. तेवढ्यात ११.११.०५ वाजता आरोपी माघारी परतून ११.११.१४ वाजता त्यांनी दुचाकीवरून पळ काढला.
७७ गरजूंना दिले हक्काचे घर
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांनी त्यांच्या आईच्या नावे स्व. कांताबाई बियाणी पार्कची उभारणी केली. या पार्कमध्ये माहेश्वरी समाजातील ७७ गरजूंना हक्काचे घरकुल देण्याचे काम त्यांनी आठ दिवसांपूर्वीच केले होते. मोठ्या थाटात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते हा घरकुल प्रदान करण्याचा सोहळा पार पडला होता.कोरोना महामारीच्या काळात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांनी सामाजिक भावनेतून गोरगरिबांच्या घरात चूल पेटविण्याचे काम केले. त्यांनी हजारो गरजूंच्या घरापर्यंत अन्नधान्याच्या किट पोहोचविल्या.