बियाणीचे मारेकरी नांदेडात होते मुक्कामी; दोन महिन्यांच्या काळात रेकी करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 02:15 PM2022-06-04T14:15:58+5:302022-06-04T14:16:11+5:30

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बियाणी हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५५ दिवस कठोर मेहनत घेतली.

Sanjay Biyani Murder Case: killers were staying in Nanded; Killed by Reiki in a span of two months | बियाणीचे मारेकरी नांदेडात होते मुक्कामी; दोन महिन्यांच्या काळात रेकी करून केली हत्या

बियाणीचे मारेकरी नांदेडात होते मुक्कामी; दोन महिन्यांच्या काळात रेकी करून केली हत्या

Next

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या मागे दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा यांचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात सात जणांना अटकही केली आहे; परंतु गोळीबार करणारे दोघे मात्र फरार आहेत. हे दोघेजण नांदेडात जवळपास दोन महिने मुक्कामी होते. त्यांनी या काळात बियाणी यांच्यावर पाळत ठेवली होती. योग्य संधी मिळण्याचीच ते वाट पाहत होते. त्यात ५ एप्रिल रोजी त्यांनी बियाणी यांची हत्या केली, अशी माहिती समोर आली आहे.

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बियाणी हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५५ दिवस कठोर मेहनत घेतली. २० अधिकारी ६० अंमलदार या तपासात होते. पोलिसांनी हत्येचा कट रचल्याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. हे सातही जण नांदेडातीलच रहिवासी आहेत. बियाणी यांच्या हत्येनंतर ते राज्याबाहेर पळून गेले होते तर बियाणी यांच्यावर गोळीबार करणारे हे बाहेर राज्यातील आहेत. शार्प शूटर म्हणून या आरोपींची ओळख आहे.

बियाणी यांच्या हत्या करण्यापूर्वी दोन महिन्यांपासून ते नांदेडात होते. कलामंदिर भागातील एका लॉजवरही आठ दिवस त्यांनी मुक्काम ठोकला होता. विशेष म्हणजे या लॉजवर त्या काळात मोठा जुगार अड्डा चालत होता. स्थानिक गुन्हे शाखेने या लॉजवर धाड मारून जुगाऱ्यांना पकडले होते; परंतु हे आरोपी तेथे असल्याची कुणकुण त्यांना लागली नव्हती. मुक्कामाच्या काळात या आरोपींनी बियाणीच्या दिनक्रमावर बारीक लक्ष ठेवले होते. ते कुठे जातात? कुणाला भेटतात? किती वाजता घरी पोहोचतात. याबाबतची खडानखडा माहिती या आरोपींकडे होती. त्याकामी नांदेडातील पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांना मदत केली होती. पोलीस आता या दोन हल्लेखोरांच्या शोधात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या टीम पाठविण्यात आल्या आहेत.

हार्डीने केली पळून जाण्यास मदत
पोलिसांनी गुरुवारी पकडलेला आरोपी हरदीपसिंघ ऊर्फ हार्डी सपुरे याचे माता साहिब गुरुद्वारा रस्त्यावर फार्म हाऊस आहे. बियाणीवर गोळीबार केल्यानंतर आरोपी थेट त्याच्या फार्म हाऊसवर गेले होते. या ठिकाणाहून हार्डीने या हल्लेखाेरांना घेऊन राज्याबाहेर पळ काढला होता. त्यांच्यासाठी हार्डी हा स्वत: वाहन चालवित होता, अशीही माहिती पुढे आली आहे.

सर्व आरोपींना ठेवले वेगळे
बियाणी हत्येत आतापर्यंत पकडण्यात आलेल्या सातही आरोपींना इतर कैद्यांसोबत न ठेवता वेगळे ठेवण्यात आले आहे. हे सर्व आरोपी कुख्यात असून, त्यांच्याभोवती दिवसरात्र खडा पहारा ठेवण्यात आला आहे. पोलीस कोठडीत त्यांच्याकडून या प्रकरणाचे आणखी धागेदोरे उकलण्याची शक्यता आहे.

Web Title: Sanjay Biyani Murder Case: killers were staying in Nanded; Killed by Reiki in a span of two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.