Sanjay Biyani Murder: अद्याप तपासाची ठोस दिशाच निश्चित नाही;प्रत्येक कारणांची खातरजमा सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 11:57 AM2022-04-08T11:57:00+5:302022-04-08T11:57:50+5:30
Sanjay Biyani Murder तपासात फारशी प्रगती नसली तरी विविध स्वरूपाची माहिती गाेळा केली जात आहे. त्याच्या विश्लेषणाअंती पुढील दाेन-चार दिवसांत सर्वकाही स्पष्ट हाेईल, असा दावा पाेलीस प्रशासनाकडून केला जात आहे.
नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder) यांची मंगळवारी भरदिवसा सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरासमाेर दुचाकीवरून आलेल्या दाेन अज्ञात मारेकऱ्यांनी गाेळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेवरून दाेन दिवस लाेटल्यानंतरही नांदेड पाेलिसांची झाेळी रिकामीच आहे. अद्याप तपासाची ठाेस दिशाच निश्चित झाली नसल्याची माहिती आहे.
संजय बियाणी यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले आहे. ही हत्या नेमकी काेणत्या कारणावरून झाली असावी, याचा शाेध पाेलीस घेत आहेत. पुढे येणाऱ्या प्रत्येक कारणांची खातरजमा केली जात आहे. रेकाॅर्डवरील ५२ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन घटनेच्या २४ तास आधी ते नेमके काेठे हाेते, याची चाैकशी केली जात आहे. मात्र, पाेलिसांना अद्याप खुनाचे कारण व मारेकरी काेण याचा सुगावा लागू शकलेला नाही. तपासात फारशी प्रगती नसली तरी विविध स्वरूपाची माहिती गाेळा केली जात आहे. त्याच्या विश्लेषणाअंती पुढील दाेन-चार दिवसांत सर्वकाही स्पष्ट हाेईल, असा दावा पाेलीस प्रशासनाकडून केला जात आहे. एसआयटीची पाच पथके वेगवेगळ्या मुद्द्यावर तपास करीत आहेत. सध्या सीसीटीव्ही, माेबाईल टाॅवर लाेकेशन याद्वारे माहिती मिळविली जात असून तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी त्याचे विश्लेषण शुक्रवारपासून केले जाणार आहे.
मारेकऱ्यांनी वापरले विनाक्रमांकाचे वाहन
मारेकरी काेठून आले, काेणत्या मार्गाने गेले यासाठी सीसीटीव्हीची तपासणी केली गेली. त्यांनी विनाक्रमांकाची दुचाकी वापरल्याचेही आढळून आले. पाेलीस महानिरीक्षक निसार तांबाेळी, जिल्हा पाेलीस अधीक्षक प्रमाेदकुमार शेवाळे तपासातील प्रगतीचा सतत आढावा घेत आहेत. अप्पर पाेलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे एसआयटीचे नेतृत्व साेपविले गेले असून परिक्षेत्रात डिटेक्शनमध्ये तज्ज्ञ मानले जाणाऱ्या पाेलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
थेट महासंचालकांनी तपासावर लक्ष ठेवावे
गुरुवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी मुंबईत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पाेलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेतली. संजय बियाणी यांच्या हत्येची घटना गंभीर आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खुनामागील नेमका हेतू काय, हा खून करणारे व त्यांचे सूत्रधार काेण, ते तातडीने पकडले जावेत, महासंचालकांनी स्वत: या तपासावर लक्ष ठेवून सतत आढावा घ्यावा, अशी मागणी ना. चव्हाण यांनी केली आहे.