मेगाच्या गोदामात साडेबाराशे पोती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:52 PM2018-08-31T23:52:51+5:302018-08-31T23:53:23+5:30
पोलिसांनी कृष्णूरच्या मेगा अॅग्रो कंपनीवर मारलेल्या धाडीला आता महिना लोटला आहे़ या धाडीत पोलिसांनी जप्त केलेल्या दहा ट्रकमधील बऱ्याचशा धान्याला कोंब फुटले आहे़ त्यात तीन दिवसांपासून मेगाच्या गोदामातील धान्याची संयुक्त पथकाकडून तपासणी सुरु आहे़ या तपासणीत मेगाच्या गोदामात फक्त साडेबाराशे पोती धान्य असल्याची माहिती आली आहे़ त्यामुळे गोदामात सहा हजार पोती धान्य असल्याचा पोलिसांचा दावा फोल ठरण्याची दाट शक्यता आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पोलिसांनी कृष्णूरच्या मेगा अॅग्रो कंपनीवर मारलेल्या धाडीला आता महिना लोटला आहे़ या धाडीत पोलिसांनी जप्त केलेल्या दहा ट्रकमधील बऱ्याचशा धान्याला कोंब फुटले आहे़ त्यात तीन दिवसांपासून मेगाच्या गोदामातील धान्याची संयुक्त पथकाकडून तपासणी सुरु आहे़ या तपासणीत मेगाच्या गोदामात फक्त साडेबाराशे पोती धान्य असल्याची माहिती आली आहे़ त्यामुळे गोदामात सहा हजार पोती धान्य असल्याचा पोलिसांचा दावा फोल ठरण्याची दाट शक्यता आहे़
धान्य घोटाळा प्रकरणात संयुक्त पथकाच्या तपासणीमध्ये दररोज नवीन बाबींचा खुलासा होत आहे़ या प्रकरणात आतापर्यंत दोघांचा जामीन बिलोली न्यायालयाने फेटाळल्यामुळे पोलिसांना हुरुप आला आहे़ तर दुसरीकडे संयुक्त पथकाच्या तपासणीत धान्य मोजणी करताना पोलिसांनी कारवाईच्या अहवालात नमूद केलेले अनेक मुद्दे खोडून निघत असल्याचे पुढे येत आहे़
सहा सदस्यीय समितीने सोमवार व मंगळवार असे दोन दिवस पोलिसांनी जप्त केलेल्या दहा ट्रक धान्याची खुपसरवाडी येथील शासकीय गोदामात तपासणी केली़ या तपासणीत ओल लागल्यामुळे यातील बºयाचशा धान्याला कोंब फुटल्याचे आढळून आले़ विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी हे धान्य खराब झाल्यास पोलीसच जबाबदार असतील असे पत्र पोलिसांना दिले होते़ त्यामुळे खराब झालेल्या धान्यासाठी जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे़
बुधवारनंतर संयुक्त पथकाने कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीतील धान्याच्या मोजणीला सुरुवात केली आहे़ या मोजणीत गेल्या दोन दिवसांत गव्हापेक्षा भुश्याचीच अधिक पोती आढळून येत होती़ पोलिसांनी मेगाच्या गोदामात स्वस्त धान्य दुकानातील ५० किलो वजनाची सहा हजार पोती धान्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे़ हाच अहवाल न्यायालयातही सादर करण्यात आला आहे़ तर दुसरीकडे कंपनीने मात्र गोदामात फक्त दीड हजार पोती असल्याचे म्हटले होते़
त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या तपासणीत मेगाच्या गोदामात फक्त साडेबाराशे पोती धान्य असल्याची माहिती हाती आली आहे़
त्यामुळे पोलिसांनी केलेला सहा पोत्यांचा दावा फोल ठरण्याची दाट शक्यता आहे़ संयुक्त पथकाचा अंतिम अहवाल आल्यानंतर ही बाब स्पष्ट होणार आहे़ परंतु, पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी धान्याच्या पोत्याची मोजदाद केली नव्हती का ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे़
भुस्सा बॉयलर पेटविण्यासाठी
मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामात धान्याच्या पोत्यापेक्षा भुश्याचीच पोती अधिक आढळली असल्याचे संयुक्त पथकाच्या मोजणीत समोर येत आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भुस्सा कशासाठी जमा केला ? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला होता़ त्यावर कंपनीने या ठिकाणी असलेले चार बॉयलर पेटविण्यासाठी हा भुस्सा वापरण्यात येत असल्याचे सांगितले़