गेन बिटक्वाईनमध्ये नांदेडात अनेकांची फसवणूक; शहरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:58 IST2025-02-27T15:56:13+5:302025-02-27T15:58:00+5:30

नांदेडातील एका डाॅक्टरने तर तब्बल ५० लाख रुपयांचे बिटक्वाईन भारद्वाजला दिले होते.

Scammed many in Nanded in Gain Bitcoin; 500 crore turnover in the city | गेन बिटक्वाईनमध्ये नांदेडात अनेकांची फसवणूक; शहरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल

गेन बिटक्वाईनमध्ये नांदेडात अनेकांची फसवणूक; शहरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल

नांदेड :नांदेडातील अनेक व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजकांनी २०१७ मध्ये आपल्या जवळील बिटक्वाईन सॉफ्टवेअरवर प्रति महिना १० टक्के व्याजदर मिळण्याच्या आमिषाने गेन बिटक्वाईन दिले होते. सुरुवातीला काही महिने गेन बिटक्वाईनने आकर्षक व्याजदरही दिले. नंतर मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक केली. यात नांदेडातून जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे. त्यात आता सीबीआयकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे.

२०१७ मध्ये या प्रकरणात नांदेडात पहिला गुन्हा दाखल झाला होता. गेन बिटक्वाईनचा मुख्य निर्माता अमित भारद्वाज हा या प्रकरणात आरोपी होता. भारद्वाज याने नांदेडात शिक्षण घेतले होते. या ओळखीचा फायदा उचलत त्याने आपल्या गेन बिटक्वाईन या डिजीटल चलनात गुंतवणूक करण्यासाठी अनेकांना आमिष दाखविले. त्यानंतर नांदेडातील अनेकांनी भारद्वाज याच्यासोबत करार करुन आपले बिट क्वाईन साॅफ्टवेअर गेन बिटक्वाईन या कंपनीला दिले. त्या बदल्यात भारद्वारज हा दर महिन्याला गुंतवणूकदारांना १० टक्के व्याज देणार होता. सुरुवातीचे काही महिने भारद्वाजने नियमितपणे गुंतवणूकदारांना व्याज दिले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेऊन नांदेडातील अनेकांनी गेन बिटक्वाईनमध्ये गुंतवणूक केली.  परंतू त्यानंतर भारद्वाजने या मंडळींची फसवणूक केली. त्यानंतर तो थेट दुबईत पळाला होता. याचदरम्यान भारद्वाज याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. त्यातच देशात आल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती.  

नांदेड पोलिसांनीही त्याचा ताबा मिळविला होता. त्यानंतर नांदेडच्या तुरुंगातही काही काळ घालविला. मध्यंतरी भारद्वाज याचा मृत्यू झाल्याने सर्व गुंतवणूकदार धास्तावले होते. आता या प्रकरणात सीबीआयकडून देशातील ६० ठिकाणी धाडसत्र सुरु करण्यात आले आहे. त्यात नांदेडचाही समावेश आहे. 

नांदेडातच घेतले भारद्वाजने शिक्षण
अमित भारद्वाज हा नांदेडातील एमजीएम महाविद्यालयात शिक्षणासाठी होता. त्यामुळे नांदेडातील अनेकांच्या तो संपर्कात होता. त्याने गेन बिटक्वाईन कंपनी सुरु केल्यानंतर नांदेडातील अनेक जणांनी त्याच्या विश्वास ठेऊन गुंतवणूक केली होती. त्यात नांदेडातील एका डाॅक्टरने तर तब्बल ५० लाख रुपयांचे बिटक्वाईन भारद्वाजला दिले होते.

Web Title: Scammed many in Nanded in Gain Bitcoin; 500 crore turnover in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.