चिमुकल्यांमुळे शाळा परिसर गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:15 AM2018-06-16T00:15:59+5:302018-06-16T00:15:59+5:30
दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर नवीन दप्तर, ड्रेस, वॉटर बॅग, वह्या पुस्तके, सोबत घेवुन नव्या उत्साहात मुलांची पावले शुक्रवारी शाळांकडे वळली़ शाळेच परिसर विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलून गेला होता़ मित्र, मैत्रिणी भेटणार या आशेने काही विद्यार्थी आनंदात, तर पुन्हा अभ्यास, झोपमोड यामुळे काहीजण कंटाळलेले दिसत होते़ आई-वडीलांचा हात सोडताना मनाची चलबिचल झालेल्या अनेक चिमुकल्यांनी तर भोकाड पसरुन शाळेचा पहिला दिवस साजरा केला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर नवीन दप्तर, ड्रेस, वॉटर बॅग, वह्या पुस्तके, सोबत घेवुन नव्या उत्साहात मुलांची पावले शुक्रवारी शाळांकडे वळली़ शाळेच परिसर विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलून गेला होता़ मित्र, मैत्रिणी भेटणार या आशेने काही विद्यार्थी आनंदात, तर पुन्हा अभ्यास, झोपमोड यामुळे काहीजण कंटाळलेले दिसत होते़ आई-वडीलांचा हात सोडताना मनाची चलबिचल झालेल्या अनेक चिमुकल्यांनी तर भोकाड पसरुन शाळेचा पहिला दिवस साजरा केला़
सुट्टीत गावी, मामा, नातेवाईकांकडे मनसोक्त मजामस्ती केल्यानंतर काहींशा जड पावलांनीच शुक्रवारी जिल्हाभरात विद्यार्थ्यांनी शाळा गाठली़ पहिल्याच दिवशी आपल्या पाल्यांना वेळेवर शाळेत पोहोचविण्यासाठी पालकांची तारांबळ उडाली होती़ शाळेत आल्याानंतर नवीन वर्ग, वर्गशिक्षक, नविन मित्र, मैत्रिणी, आपला बाक कोणता असेल या बाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती़ एकमेकांना नवीन वस्तु दाखविण्यात अनेक विद्यार्थी दंग झाले होते़ अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फुले, चॉकलेट देवुन स्वागत करण्यात आले़
---
चिमुकल्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार का?
मुलांच्या किलबिलाटात शुक्रवारी जिल्हयात शाळांना सुरुवात झाली़ पहिला दिवसा असल्यामुळे कुणाच्या पाठीवर दप्तराचे फारसे ओझे दिसले नाही़ परंतु दप्तर हलके व्हावे यासाठी शाळांनी कुठलेही प्रयत्न केले नसल्याचे आणि प्रशासनानेही वॉच ठेवणारी यंत्रणा उभारली नसल्याचे आढळुन आले़ त्यामुळे दप्तराचे ओझे कितपत कमी होईल ? या बाबत शंका उपस्थित होत आहे़ मागील शैक्षणिक वर्षात या विषयावर न्यायालयाने दखल घेत शासनाला दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत निर्देश दिले होते़ त्यावर शिक्षण विभागाने नव्या सत्रापासून ओझे कमी करण्यात येईल असे सांगितले होते़
---
फुलांनी झाले विद्यार्थ्यांचे स्वागत
जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांमध्ये शुक्रवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलांनी स्वागत करण्यात आले़ पहिलाचा दिवस असल्यामुळे अनेक स्कुलबस विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आल्याच नव्हत्या़ त्यामुळे आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकानांच चांगलीच कसरत करावी लागली़ सध्या शालेय साहित्याचे दर वाढले असल्यामुळे यंदा शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांना अधिकचे पैसे मोजावे लागले़ अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक स्वागत कमानी उभारल्या होत्या़ पहिला दिवस असल्यामुळे काही शाळांनी प्रवेशोत्सव झाल्यानंतर सुट्टी दिली होती़