शाळेतील किलबिलाट सुरू, विद्यार्थी उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:49 AM2020-12-04T04:49:05+5:302020-12-04T04:49:05+5:30
अर्धापूर : अर्धापूर तालुक्यात एकूण ११० शाळा असून त्यापैकी २३ माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची घंटा तब्बल आठ महिन्यांनी ...
अर्धापूर : अर्धापूर तालुक्यात एकूण ११० शाळा असून त्यापैकी २३ माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची घंटा तब्बल आठ महिन्यांनी वाजली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाळा सुरू होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अखेर तालुक्यातील शाळेची घंटा वाजल्याने विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा प्रांगणात सुरू झाला.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मार्चपासून सर्व शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने व शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. काही शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण न झाल्याने पुन्हा स्थगिती देण्यात आली व २ डिसेंबर रोजी अर्धापूर तालुक्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या असून, सोमवारी तालुक्यातील ११० पैकी २३ शाळा सुरू करण्यात आल्या.
कोरोनामुळे सर्व शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले होते. कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शाळा सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली होती. प्रदीर्घ काळानंतर अर्धापूर तालुक्यातील २३ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळा संस्थांकडून शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. अर्धापूर तालुक्यात नववी ते बारावीच्या २३ शाळा आहेत. या २३ शाळांमधील हजारो विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात येत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी २११ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांतील हॉलमध्ये जंतुनाशक फवारण्यात आले आहे. थर्मल गनचा वापर करत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सोशल डिस्टन्स ठेवत कोरोनासंदर्भात खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी रुस्तुम ससाने व गंगाधर राठोड यांनी यावेळी दिली.