तीन शाळेतील शिक्षकांचा बहिष्कार; विद्यार्थी वाऱ्यावर, बिलोली तालुक्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:47 AM2018-07-14T06:47:20+5:302018-07-14T06:47:37+5:30
बिलोली तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व संस्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़
नांदेड - बिलोली तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व संस्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़
तालुक्यात बिलोली, बिजूर व कुंडलवाडी येथे लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या पहिली ते आठवी अशा तीन शाळा चालतात़ प्रारंभी दोन वर्षे प्रगतीकडे घोडदौड करणाºया शाळेतील शिक्षकांचे व संस्थाचालकांचे बिनसले़ आर्थिक देवाणघेवाण, पगारातून परस्पर कपात आदी वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या़ जिल्हा परिषदेसमोर सामूहिक उपोषणही केले़ मागच्या सहा महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या़ अशा परिस्थितीमुळे अशोक विद्यालय कुंडलवाडी येथील ३०० विद्यार्थ्यांनी एकाच पंधरवड्यात शाळा सोडली़ बिलोलीतील सत्यसाई विद्यालयातही असाच प्रकार झाला़ शिक्षक व संस्थाचालकांचे बिनसल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालकही सैरावैरा झाले़ जून-जुलैच्या महिन्यात प्रवेश प्रक्रिया असताना विद्यार्थी शाळा सोडून गेले़ शुक्रवारी एकाही शाळेत शिक्षक आले नाहीत. सर्व वर्गांची मुले एकत्रित करून शाळा सुरू ठेवण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली़ याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार आल्यानंतर बिलोली गट शिक्षणाधिकाºयांनी विस्तार अधिकारी डी़व्ही़धुळशट्टे यांना पाठवून रितसर चौकशी केली़ शाळेवर शिक्षकच नसल्याने चिमुकले विद्यार्थी कार्यालयासमोर एकत्रित जमा झालेले त्यांना दिसले.
पूर्वसूचना न देता गैरहजर
पालकांच्या तक्रारीनंतर शाळेची पाहणी करून चौकशी केली व शासन दरबारी कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व शिक्षक गैरहजर आहेत, असा अभिप्राय नोंदवून वरिष्ठांना कळवले.
- डी.व्ही. धुळशेट्टे, विस्तार अधिकारी, बिलोली
याआधीही असेच घडले होते
१३ जुलै रोजी तीनही शाळेतील मुख्याध्यापक वगळता सर्व २४ शिक्षक कोणतीही रजा अथवा पूर्वसूचना न देता गैरहजर झाले़ यापूर्वी सुद्धा अशीच आंदोलनाची भूमिका शिक्षकांनी घेतली होती.
- संदीप गायकवाड, मुख्याध्यापक
पालकांनाच धमक्या
शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना अथवा प्रवेश घेणाºया पालकांना हे शिक्षक पिटाळून लावतात़ शाळा बंद होणार असे सांगतात़ येथे आता कोणीही शिकवत नाही़ शाळेत विद्यार्थ्याला नाव घालू नका अशा वेगवेगळ्या धमक्या दिल्या जातात.
- बाळासाहेब राचुरे, संस्था सचिव, बिलोली
शिक्षण विभागाकडून संस्थेच्या तीनही शाळांची चौकशी सुरू आहे.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प.नांदेड