कोरोना लसीकरण ठरविणार शाळा कधी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:17 AM2021-05-14T04:17:50+5:302021-05-14T04:17:50+5:30
यावर्षी पुन्हा मार्च महिन्यापासून कोरोनाची रुग्ण संख्या वाढत गेली. त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. पहिली ते ...
यावर्षी पुन्हा मार्च महिन्यापासून कोरोनाची रुग्ण संख्या वाढत गेली. त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष कसे राहणार याविषयी पालक, विद्यार्थी संभ्रमात आहेत. यंदाही जूनपासून सुरू होणाऱ्या शाळेवर कोरोनाचे सावट असणार आहे. त्यासाठी लसीकरणाचा आधार ठरणार आहे. १०० टक्के लसीकरण झाले तर त्या भागातील शाळा सुरू होण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
चौकट- शिक्षणाधिकारी म्हणतात
शाळा सुरू होण्याच्या संदर्भात आताच काही मत मांडता येणार नाही. कारण पुढील दिवसांत परिस्थिती कशी राहणार यावर ते अवलंबून आहे. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. तसेच लसीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यानुसारच शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय शासनाकडून घेण्यात येईल. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड.
चाैकट- विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक
१.कोरोनाची तिसरी लाट येत असल्याने आतापासूनच भीती वाटत आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत कसे पाठविणार. मागील वर्षीसुद्धा असेच गेले. आता हे वर्षही असेच जाणार की काय, अशी भीती वाटत आहे. मात्र, मुले घरात राहून खूप कंटाळली आहेत. त्यांची शाळेविषयीची ओढ वाढली आहे. - अशोक गालफाडे, पालक
२. गेले वर्षभर आम्ही शाळेत गेलो नाही. घरी बसूनच अभ्यास केला. आता शाळेत जाण्याची घाई झाली आहे. यावर्षी तरी शाळा सुरू होणार की नाही, हेसुद्धा कळत नाही. कोरोना कधी संपणार आणि आम्हाला मुक्तपणे खेळायला कधी मिळणार, याच विचारात आम्ही आहोत. - दिव्या उफाडे, विद्यार्थिनी
३. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती. आता यावर्षी कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे शस्त्र आहे. त्यामुळे यंदा शाळा सुरू होतील. मात्र, त्यासाठी पूर्णपणे लसीकरण होणे गरजेचे आहे. नाही तर यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. -डब्लू. एच. शेख, मुख्याध्यापक.