विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत, नांदेड जिल्ह्यात नदीपात्रातूनच गाठावी लागते शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 06:53 PM2018-07-14T18:53:22+5:302018-07-14T19:02:22+5:30
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील मनुला, माटाळा (ता. हदगाव) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पैनगंगा नदीपात्रातून ये-जा करावी लागते. महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारत देशात आजही शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
- रामेश्वर बोरकर
निवघा बाजार (नांदेड) : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या मनुला, माटाळा (ता़ हदगाव) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पैनगंगा नदीपात्रातून ये-जा करावी लागते़ या नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना कधी गुडघाभर तर कधी कंबरेएवढ्या पाण्यातूनच शाळेचा मार्ग काढावा लागतो़ त्यात कधी नदीला पाणी वाढलेच तर मात्र शाळेतच मुक्काम करण्याची वेळ येते़.
हदगाव तालुक्यातील मनुला बु़ येथे जिल्हा परिषदेची ५ वी तर माटाळा येथे ४ थी पर्यंत शाळा आहे़ त्यामुळे या दोन्ही गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी हदगाव किंवा विदर्भाच्या उमरखेड तालुक्यातील पळशी येथे जाण्याशिवाय पर्याय नाही़ त्यात या दोन्ही गावांतील जवळपास शंभरावर विद्यार्थ्यांनी पळशी येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतले आहेत़ मनुला, माटाळा ते पळशी हे अंतर जवळपास दीड किमीचे आहे़ तर रस्ता मार्गाने पळशी गाठावयाचे असल्यास मनुला येथील नागरिकांना २५ किमीचे अंतर कापून हदगावला यावे लागते़ त्यानंतर हदगाव येथून जवळपास पाच ते सहा किमी पळशी गावचे अंतर आहे़ त्यामुळे गावकरी आणि विद्यार्थी नदीपात्रातूनच पळशी गाठतात़
यापूर्वी पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्यासाठी उसाचे ट्रक ये-जा करीत़ त्यासाठी नदीवर छोटा पूल उभारण्यात आला होता़ परंतु, यंदा पावसामुळे हा पूलही वाहून गेला़ या पुलावरुनच यापूर्वी विद्यार्थी शाळेत जात होते़ यंदा पूलच नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नदीपात्रातील कंबरेएवढ्या पाण्यातूनच पळशी येथील शाळा गाठावी लागते़ नदीचे पाणी वाढल्यावर मात्र विद्यार्थ्यांना घरीच बसावे लागते़ शिक्षणासाठी दररोज विद्यार्थ्यांचा असा जीवघेणा प्रवास सुरु आहे़ त्यामुळे सकाळी शाळेत गेलेला पाल्य सायंकाळी सुरक्षित परतेल का? या चिंतेत येथील पालक आहेत़
शाळेतच करावा लागतो मुक्काम
सकाळी नदीपात्र ओलांडून शाळेत विद्यार्थी गेले अन् त्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास मात्र विद्यार्थ्यांना शाळेतच मुक्काम करावा लागतो़ शाळेचे शिक्षकच या मुलांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करतात़ तर काही मुलांचे नातेवाईक पळशी येथे आहेत़ त्या नातेवाईकांच्या घरी ही मुले थांबतात़ अशी प्रतिक्रिया देवबा बनसोडे या पालकाने दिली़
दररोज एका पालकाकडे जबाबदारी
नदीपात्रातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित नदीपात्र ओलांडून देण्यासाठी दररोज एका पालकाकडे जबाबदारी देण्यात आली आहे़ एकमेकांत समन्वयाद्वारे हे पालक मुलांना नदीपात्र ओलांडून देतात़, अशी माहिती अप्पाराव खराटे यांनी दिली़
नावही झाली गायब
यापूर्वी नदीपात्र ओलांडण्यासाठी या ठिकाणी नाव होती़ नदीपात्राचे पाणी वाढल्यानंतर अनेकजण नावेद्वारे पळशी गाव गाठत होते़ परंतु, यंदा नावेची व्यवस्थाही या ठिकाणी नाही़ त्यात अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे नदीपात्रात पाणी कमी दिसत असले तरी ते ओलांडताना विशेष खबरदारी घ्यावी लागत असल्याचे कैैलास जाधव, कमलाबाई जाधव, शांताबाई लामटिळे या पालकांनी सांगितले़
किमान बोटची व्यवस्था करावी
याबाबत विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार पेंदे म्हणाले़, नदीपात्रात पाणी वाढल्यानंतर या विद्यार्थ्यांना शाळेतच थांबून ठेवावे लागते़ दररोज जवळपास ९० मुले नदीच्या पाण्यातूनच शाळेत येतात़ अनेकवेळा त्यामुळे त्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होतो़ उन्हाळ्यामध्ये नदीपात्रात बुडून एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यूही झाला होता़ याबाबत नांदेड आणि यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़ या ठिकाणी किमान एका बोटची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ -