जीवघेण्या संघर्षानंतर कीव्हमधून वैज्ञानिक मुनेश्वर भारतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 06:25 AM2022-03-07T06:25:53+5:302022-03-07T06:26:58+5:30
अनुराग पाेवळे लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : तब्बल १६ वर्षांपूर्वी भारत साेडून परदेशात स्थायिक झालेले राजेश मुनेश्वर हे शुक्रवारी ...
अनुराग पाेवळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : तब्बल १६ वर्षांपूर्वी भारत साेडून परदेशात स्थायिक झालेले राजेश मुनेश्वर हे शुक्रवारी आपल्या कुटुंबीयांसह भारतात परतले आहेत. वैज्ञानिक म्हणून काम करत असलेले त्यांचे स्पेस रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटर रशियाच्या बाॅम्ब हल्ल्यात नष्ट झाले आहे. घराजवळही अनेक मिसाईल हल्ले त्यांनी पाहिले. या युद्धभूमीतून जीवघेणी पायपीट करत ते राेमानियात पाेहाेचले. तेथून ते दिल्लीत आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील सिरंजणी (ता. हिमायतनगर) येथील मूळ रहिवासी असलेले राजेश मुनेश्वर यांनी आपले शिक्षण नागपूर येथे पूर्ण केले. त्यानंतर युक्रेनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. तेथेच ते स्थायिक झाले. काही दिवस रशियातील माॅस्काे येथे वास्तव्य केल्यानंतर ते युक्रेनमध्ये स्पेस रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. इंडाे-युक्रेन या प्रकल्पांतर्गत ते कार्यरत हाेते.
युद्ध सुरू झाल्यानंतर ते राहत असलेल्या कीव्ह शहरावर रशियाने हल्ले सुरू केले. या हल्ल्याचा अनुभव त्यांनी स्वत: घेतला. ते काम करत असलेल्या स्पेस सेंटरलाही रशियाने लक्ष्य केले. घराजवळही बाॅम्ब हल्ले झाले. या बाॅम्ब हल्ल्याचे अगदी बाल्कनीतून ते साक्षीदार हाेते. सरकारच्या सूचनेनंतर त्यांनी कुुटुंबीयांसह शहर साेडले. दाेन दिवस प्रवास करत ते रेल्वे स्टेशनवर पाेहाेचले. तेथे स्थानिक विरुद्ध परदेशी असा भेदभाव केला जात हाेता. बाळाला घेऊन पत्नी रेखा मुनेश्वर यांच्यासह बर्फ पडत असताना त्यांनी जीवघेणी पायपीट केली. साेळा तासांचा बस प्रवास करून ते बाॅर्डर क्राॅस करून राेमानियात पाेहाेचले. राेमानियात उभारलेल्या आश्रयस्थळी थांबले. तेथून भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला. तेथे केंद्रीय मंत्री ज्याेतिरादित्य शिंदे यांनीही मदत केली.
युद्धाला अमेरिका, नाटाे जबाबदार
या युद्धाला नाटाे आणि अमेरिका जबाबदार असल्याची प्रतिक्रिया वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांनी दिली. रशियाकडून युक्रेनला वारंवार इशारे दिले जात हाेते. मात्र, अमेरिका आणि नाटाे देशांच्या बळावर युक्रेनने त्याकडे दुर्लक्षच केले. हे युद्ध आणखी दाेन महिने तरी सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
nआपण इस्रोसाेबत काम करण्यास तयार असून, याबाबत इस्रोशी संपर्क केला आहे. डीआरडीओ साेबतही काम करण्यास आपण तयार आहाेत, असे मुनेश्वर म्हणाले.