पाईप चोरी प्रकरणाची व्याप्ती वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:35 AM2018-03-11T00:35:40+5:302018-03-11T00:36:13+5:30
जुन्या नांदेडातील होळी प्रभागात सुरु असलेल्या पाणीपुरवठा कामासाठी आणलेले पाईप हे चोरीचे असल्याच्या संशयावरुन जप्त केल्यानंतर आता प्रकरणाची पाळेमुळे अगदी दूरवर असल्याचे स्पष्ट होत आहे. तेलंगणातील दोन पाईप कंपनीच्या प्रतिनिधींनी जुन्या नांदेडात टाकलेले हे पाईप आपल्या कंपनीचे असल्याचे व ते चोरुन आणल्याचा दावा केला. त्यानंतर पोलिसांनी तब्बल दोनशेहून अधिक पाईप जप्त केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जुन्या नांदेडातील होळी प्रभागात सुरु असलेल्या पाणीपुरवठा कामासाठी आणलेले पाईप हे चोरीचे असल्याच्या संशयावरुन जप्त केल्यानंतर आता प्रकरणाची पाळेमुळे अगदी दूरवर असल्याचे स्पष्ट होत आहे. तेलंगणातील दोन पाईप कंपनीच्या प्रतिनिधींनी जुन्या नांदेडात टाकलेले हे पाईप आपल्या कंपनीचे असल्याचे व ते चोरुन आणल्याचा दावा केला. त्यानंतर पोलिसांनी तब्बल दोनशेहून अधिक पाईप जप्त केले आहेत.
मनपाच्या प्रभाग क्र. १४ होळी येथे दलित वस्ती निधीतून सुरु असलेल्या कामावरील पाईप हे चोरीचे असल्याची माहिती इतवारा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयावरुन ५ मार्चच्या रात्री १४ पाईप जप्त केले. त्यानंतर या प्रकरणात इतवारा पोलिसांनी निर्मल पोलिसांशी संपर्क साधला. तसेच पाईप कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. शुक्रवारी एल अँड टी कंपनीचे प्रतिनिधी नांदेडात दाखल झाले. त्यांनी केलेल्या पाहणीत त्यांच्या कंपनीचे १२ पाईप आढळले. मात्र शहरातील इतर पाईप हे तेलंगणा, आंध्रातील विश्वा तसेच मेघा कंपनीचे असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी मेघा व विश्वा कंपनीच्या प्रतिनिधीला संपर्क साधला. हे प्रतिनिधी शनिवारी नांदेडमध्ये आले. त्यांनी जुन्या नांदेडात पाणीपुरवठा सुरु असलेल्या विविध भागांना भेटी दिल्या असता हे पाईप आपल्याच कंपनीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ते चोरुन आणल्याचेही त्यांनी सांगितले. इतवारा पोलिसांनी हे सर्व पाईप जप्त केले़ जवळपास २०० हून अधिक पाईप शनिवारी सायंकाळपर्यंत जप्त करण्यात आले होते़ जिथे जिथे काम सुरू आहे, तिथे कंपनीचे प्रतिनिधी पाहणी करून आपल्या कंपनीच्या पाईपची पाहणी करीत होते़ रविवारीही ही पाहणी सुरूच राहणार असल्याचे तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांनी सांगितले़
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही़ पाईप कंपनीचे प्रतिनिधी निर्मल तसेच तेलंगणातील ज्या ज्या ठिकाणाहून पाईप आणले आहेत, तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तेलंगणा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे़ पाईपची पाहणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाईप चोरीचे आंतरराज्यीय रॅकेट समोर येण्याची शक्यता इतवारा पोलिसांनी वर्तवली आहे़ मेघा कंपनीचे जवळपास १०० तर विश्वा कंपनीचे ५४ पाईप पोलिसांनी जप्त केले होते़ तसेच शहरातील विविध कामांवरील पाईपची पाहणी केली जात होती़ या प्रकरणात मनपाने पोलिसांना एक पत्र देवून प्रभाग १४ मधील कामाची त्रोटक माहिती दिली़ या माहितीपेक्षा आता तेलंगणातील पाईप कंपनीच्या प्रतिनिधींनी किती पाईप चोरीला गेले, याची माहिती स्पष्ट केल्यानंतर तेलंगणा पोलिसांच्या तपासाला महत्त्व येणार आहे़
तेलंगणा राज्यात मिशन भगिरथा वॉटर स्कीम आणि मिशन अमृत वॉटर स्कीमअंतर्गत संपूर्ण राज्यात काम सुरू आहे़ या योजनेअंतर्गत पाईप पुरवण्याचे काम मेघा आणि विश्वा या कंपन्यांकडून केले जात आहे़ संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी पाईप टाकण्यात आले आहेत़ प्रभाग १४ होळी येथील काम करणाºया सोहेल कन्स्ट्रक्शनला नोटीस बजावली आहे़ शनिवारी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांना विचारणा केली असता सोहेल कन्स्ट्रक्शनने आतापर्यंत कोणतेही उत्तर दिले नसल्याचे सांगितले़ त्यांना वेळ देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले़ आयुक्त गणेश देशमुख यांनीही या प्रकरणात ठेकेदाराकडून पाईप खरेदीचे देयके मागविण्यात आल्याचे सांगितले़ कंत्राटदाराने दिलेले देयके महापालिकेकडूनही तपासण्यात येतील़ ती देयके बोगस आढळल्यास कंत्राटदारावर महापालिकेकडूनही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले़
सबकॉन्ट्रॅक्टर नेमण्याचा प्रयत्न
४महापालिकेच्या रेकॉर्डवर काम करीत असलेल्या सोहेल कन्स्ट्रक्शनकडून या कामावर सबकॉन्ट्रॅक्टर नेमण्याची कागदोपत्री प्रक्रिया दोन दिवसांत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे़ या सर्व प्रक्रियेला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांकडून आवश्यक ते सहकार्य केले जात आहे़ परिणामी कंत्राटदाराच्या बचावासाठी अधिकारी सरसावले असल्याचेही चित्र आहे़
पाईपमध्ये अडकले कोण कोण?
४जुन्या नांदेडातील विविध कामांचे कंत्राट हे लोकप्रतिनिधीकडूनच वेगवेगळ्या नावाने घेतले जाते, हे उघड गुपित आहे़ होळी प्रभागातील कामही अशाच पद्धतीने सुरू असल्याची माहिती आहे़ त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केल्यास या प्रकरणात अनेक राजकीय नावेही पुढे येणार आहेत़ त्यामुळे पाईपमध्ये अडकले कोण कोण? हाच प्रश्न आता जुन्या नांदेडात चर्चीला जात आहे़