‘एसडीआरएफ’ला मराठवाड्याचे वावडे, एकाही जिल्ह्यात नाही पूर्णवेळ पथक
By प्रसाद आर्वीकर | Published: June 14, 2024 09:31 AM2024-06-14T09:31:53+5:302024-06-14T09:32:16+5:30
SDRF: राज्य आपत्ती निवारण बलाची (एसडीआरएफ) स्वतंत्र तुकडी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात नसल्याने पावसाळा वगळता इतर वेळी निर्माण झालेल्या आपत्ती काळात मदत पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते.
- प्रसाद आर्वीकर
नांदेड - राज्य आपत्ती निवारण बलाची (एसडीआरएफ) स्वतंत्र तुकडी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात नसल्याने पावसाळा वगळता इतर वेळी निर्माण झालेल्या आपत्ती काळात मदत पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते.
राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाच्या (एनडीआरएफ) अंतर्गत राज्य आपत्ती निवारण बल (एसडीआरएफ) कार्यरत असते. राज्यात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांमार्फत तातडीने मदतकार्य केले जाते. त्यामुळे आपत्ती काळामध्ये अनेक जीव वाचू शकतात. संपूर्ण मराठवाडा विभागासाठी पावसाळ्यामध्ये एसडीआरएफची केवळ एक तुकडी नियुक्त केली जाते. आपत्ती केव्हाही सांगून येत नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी एसडीआरएफची तुकडी पूर्णवेळ कार्यरत ठेवावी, अशी मागणी होत आहे.
मदतीसाठी लागतात७ ते १० तास
पावसाळा वगळता इतर काळात मराठवाड्यामध्ये आपत्ती परिस्थिती निर्माण झाली तर मदतकार्य मागविण्यासाठी८ ते १० तास लागतात.
धुळे येथून एसडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी ८ तास तर पुण्यातून येण्यासाठी १० तास लागतात.
पुरातून वाचविले होते...
- मागील वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यासाठी नियुक्त केलेली एसडीआरएफची टीम नांदेड येथे मुक्कामी होती. या पथकातील जवानांनी मुदखेड, अर्धापूर, कासारखेडा, माहूर आदी ठिकाणी बचाव कार्य करून २८ जणांना पुरातून बाहेर काढले होते.
- परभणीतील मानवत तालुक्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला सुखरुप बाहेर काढले.
राज्यात बारा ठिकाणी एसआरपीएफ केंद्र
मुंबई, पुणे, दौंड, सोलापूर, जालना, अमरावती, नागपूर, हिंगोली, धुळे, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, कोल्हापूर या १२ ठिकाणी राज्य राखीव बलाचे प्रशिक्षण केंद्र आहे.
छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि कोल्हापूर या ठिकाणी राखीव बलाच्या तीन तुकड्या ठेवल्या आहेत. विदर्भातील नागपूर आणि धुळे या ठिकाणी एसडीआरएफची तुकडी कार्यरत आहे.
मराठवाड्यासाठीही छत्रपती संभाजीनगर, हिंगोली किंवा जालना येथे एसडीआरएफची तुकडी पूर्णवेळ कार्यरत होऊ शकते.