नांदेडमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर; शाळेबाहेर सर्रास होतेय छेडछाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 05:25 PM2019-12-10T17:25:56+5:302019-12-10T17:27:46+5:30
सिडकोतील कुसुमताई शाळा प्रशासनाची पोलिसांकडे धाव
नांदेड- मध्यंतर अन शाळा सुटल्यावर टारगट मुलांकडून विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या घटना वाढत गेल्याने अखेर शाळा प्रशासनाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. टारगट मुलांना समजावून सांगून सुद्धा त्रास कमी न झाल्याने वैतागून शाळा प्रशासनाला पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे.
सिडको भागातील कुसुम ताई शाळेत शेकडो विद्यार्थिनी शिक्षण घेतात. या ठिकाणी पहिली ते दहवी पर्यंत शिक्षण दिले जाते. मध्यंतर अन शाळा सुटण्याच्या वेळी टारगट मुलांचे घोळके शाळेबाहेर थांबत आहे, त्यांच्याकडून विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत अनेक विद्यार्थीनी शिक्षकांकडे तक्रार दिला. शिक्षकांनी टारगट मुलांना समजविण्याचा प्रयत्न ही केला. परंतु त्यानंतर ही घटनांना आळा बसला नाही.
त्यामुळे शाळेने थेट नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली. टारगट मुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे शालेय विद्यार्थीनीच्या छेडछाडीच्या घटना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.