महामार्ग प्रकरणी नव्याने प्रस्ताव पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:07 AM2018-02-21T00:07:17+5:302018-02-21T00:10:03+5:30
अर्धापूर तालुक्यातून जाणा-या ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील जमीनधारकांना सरसकट मावेजा मिळावा यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठवावा. हा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर शेतक-यांना सरसकट मावेजा मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील शेतक-यांशी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अर्धापूर तालुक्यातून जाणा-या ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील जमीनधारकांना सरसकट मावेजा मिळावा यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठवावा. हा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर शेतक-यांना सरसकट मावेजा मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील शेतक-यांशी बोलताना दिली.
अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, पार्डी, शेणी, चिंचबन, जांभरून, दाभड, बाबापूर, पिंपळगाव यासह अनेक गावांतील शेतकºयांची राष्ट्रीय महामार्गालगत असलेली जमीन शासनाकडून संपादित करण्यात येत आहे. ही जमीन संपादित करताना शासनाने जे निकष लावले आहेत़ या निकषासंदर्भात शेतक-यांमध्ये असंतोष असून त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी मंगळवारी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी पार्डी येथे बैठक घेतली. यावेळी आ.डी.पी.सावंत, गणपतराव तिडके, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, किशोर स्वामी आदींची उपस्थिती होती. शासनाने भूसंपादन करताना एकाच शेतक-याच्या जमिनीला १००, ७० आणि ३० टक्के या पद्धतीने मोबदला देत आहे. राष्ट्रीय महामार्गासंदर्भात शासनाने केलेल्या भूसंपादित जमिनीच्या १०० टक्के मावेजा मिळावा तसेच सातबारा व होल्डिंग वेगवेगळी असताना एकाच व्यक्तीच्या नावाने नोटीस आल्याने शेतक-यांच्या जमिनीचा मावेजा कमी मिळत आहे.
एकाच कुटुंबातील अनेक भाऊ असताना रस्त्यालगतच्या जमिनीचा एकालाच मोबदला मिळत आहे. पार्डी येथील शेतक-यांची जमीन टोलनाक्यासाठी संपादित करण्यात येत आहे. पार्डी या गावातील रस्त्यावरील घरे संपादित करण्यात येत असून घरावर ५० वर्षांपासून ताबा आह़ नमुना नंबर ८ असूनसुद्धा शासन मान्य करीत नसून शेतमालकाच्या नावाने नोटीस काढण्यात आल्या आहेत.
त्यासोबतच अर्धापूूर शिवारातील जमिनीला ग्रामीण भागापेक्षा कमी मोबदला देण्यात येत आहे. या सर्व बाबी बाधित शेतकºयांवर अन्याय करणा-या आहेत. यासंदर्भात शासनस्तरावर आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी सदाशिव देशमुख, रतन देशमुख, नारायण देशमुख, श्याम मरकुंडे, श्याम तिमेवाड आदी शेतक-यांनी खा.चव्हाण यांच्याकडे केली होती़ यासंदर्भात शेतक-यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अर्धापूूरसाठी अधिक मावेजा मिळावा यासाठी शासनाकडे आपण प्रयत्न करू, त्यासोबतच मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांतील खासदारांशी संपर्क करून सर्वांच्यावतीने सर्वांसाठी एकच मावेजा मिळावा यासाठी दिल्ली येथे जावून केंद्र शासनाशी चर्चा करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच अर्धापूूर बायपास संदर्भाने चूक झाली असल्यास त्यात दुरुस्ती करावी अशा सूचना यावेळी खा.चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या. ज्या शेतक-यांच्या जमिनीचे अवॉड झाले आहेत अशा शेतक-यांनी आपल्या तक्रारी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.जमीन संपादन केलेल्या शेतक-यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही खा़चव्हाण यांनी केली़
यावेळी लतिफ, संभाजी साबळे, अब्दुल वाहब, गोविंदराव देशमुख, विठ्ठलराव पतंगे, सुनील कदम, माधवराव कवडे, नरेंद्रसिंग परमार, राजकुमार देशमुख, अनिल साबळे, आनंद कल्याणकर, श्यामसुंदर कल्याणकर, बालासाहेब देशमुख, मधुकरराव देशमुख, नंदकिशोर देशमुख, कैलाश देशमुख, अरुण कल्याणकर, बालासाहेब मदने, पांडुरंग कल्याणकर, प्रकाश देशमुख, मारोती हापगुडे, श्याम मरकुंदेंसह असंख्य शेतकरी उपस्थित होते़
मावेजाबाबत शेतक-यांमध्ये असंतोष
राष्ट्रीय महामार्ग ३६१ साठी सध्या शासनाकडून भूसंपादन करण्यात येत आहे़ परंतु भूसंपादनातील मावेजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या टप्प्यांमुळे शेतक-यांमध्ये असंतोष आहे़ काही दिवसांपूर्वी याविरोधात हदगाव तालुक्यातील शेतक-यांनी आंदोलन केले होते़ काही जणांनी या प्रकरणात न्यायालयातही धाव घेतली आहे़ भूसंपादनाची जमीन एकच असताना मावेजामध्ये फरक का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे़
बैठकीतच महिलेने फोडला टाहो़़़
सरस्वतीबाई दोईफोडे या महिलेने खा़ चव्हाण यांच्यासमोर घराची समस्या मांडली़ त्या म्हणाल्या, आमची तिसरी पिढी या जागेवर राहत़े़ हे घर आमच्या सास-याच्या वडिलांनी घेतले होते़े त्यावेळेस १०० रुपयांच्या बाँड पेपरवर झालेल्या व्यवहाराची प्रत आमच्याजवळ आहे, परंतु सातबा-यावर आमचे नाव नसल्याने आमच्या जमिनीचे पैसे देण्यास नकार देण्यात येत आहे़ हा आमच्यावर अन्यायच असल्याचा टाहो त्या महिलेने फोडला़