ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ गो़रा़ म्हैसेकर यांचे निधन
By Admin | Published: September 24, 2016 03:39 AM2016-09-24T03:39:55+5:302016-09-24T03:39:55+5:30
विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे कडक शिस्तीचे डॉ़ गोविंद रामचंद्र तथा गो़ रा़ म्हैसेकर यांचे गुरुवारी रात्री निधन झाले़
नांदेड : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, स्वतंत्रता सेनानी, राज्यसभा सदस्य, कुलगुरू अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे कडक शिस्तीचे डॉ़ गोविंद रामचंद्र तथा गो़ रा़ म्हैसेकर यांचे गुरुवारी रात्री निधन झाले़ ते ९४ वर्षांचे होते. शुक्रवारी दुपारी शहरातील गोवर्धन घाट स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
गेल्या अनेक दिवसांपासून ते अंथरुणाला खिळून होते़ गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली़ मनपाचे माजी आयुक्त तथा नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष डॉ़ दीपक म्हैसेकर तसेच नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ दिलीप म्हैसेकर यांचे ते वडील होत. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी म्हैसेकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठविले होते़ १९७६ ते १९८२ या काळात राज्यसभेचे सदस्य होते़
राज्य नियोजन समितीेसह राज्य शिक्षण मूल्यमापन समिती, राज्य एनसीसी कमिटी, पंचायत राज्य मूल्यमापन समिती, ग्रामीण रोजगार हमी योजना, पागे समिती इत्यादी अनेक समित्यांबरोबरच मराठवाडा विकास परिषद व जनता विकास परिषदेचे संस्थापक सदस्य होते़ बाबा आमटे यांचा आदर्श घेऊन त्यांनी नांदेड येथे नेरली कुष्ठधाम उभारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला़ शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डी़लिट देऊन सन्मानित केले होते़ (प्रतिनिधी)
>डॉ.म्हैसेकर हे थोर शिक्षक, प्रशासक आणि अत्यंत सहृदयी व्यक्ती होते. गरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची दारे उघडी व्हावीत यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. - विद्यासागर राव, राज्यपाल
डॉ. म्हैसेकर यांच्या निधनाने शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे एक थोर शिक्षणतज्ज्ञ आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे ध्येववादी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री