निवृत्तीच्या दिवशी वरिष्ठ अधिकारी निलंबित
By admin | Published: April 1, 2017 03:40 AM2017-04-01T03:40:53+5:302017-04-01T03:40:53+5:30
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांच्यावर पदाचा दुरुपयोग, अनियमितता केल्याचा
नांदेड : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांच्यावर पदाचा दुरुपयोग, अनियमितता केल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्त डॉ़ पुरुषोत्तम भापकर यांनी शुक्रवारी निलंबित केले़ विशेष म्हणजे, केंद्रे शुक्रवारी सेवानिवृत्त होणार असल्याने निरोप समारंभाची तयारी सुरु असतानाच त्यांच्या निलंबनाचा आदेश धडकला.
नांदेड जिल्हा परिषदेचे सीईओ प्रशिक्षणासाठी एक महिन्याच्या रजेवर असताना पद्माकर केंद्रे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे होती़ १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या काळात त्यांनी अनेक प्रकरणांत नियमबाह्य निर्णय व प्रशासकीय स्वरुपाच्या अनियमितता केली, असे निलंबन आदेशात म्हटले आहे. त्यात मानव विकासअंतर्गत ड्युएल डेस्क खरेदीमध्ये नियम बदलून निविदा काढल्या, त्याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने ई-निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली़ त्यामुळे ड्यूएल डेस्कची खरेदी झाली नाही़ शासकीय निधीचा अपहार केलेल्या एम़एम़बंडे, एस़व्हीक़ौसल्ये या ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल न करता पुनर्स्थापना करणे, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाच्या ११ कर्मचाऱ्यांना गैरहेतूने पदोन्नतीने पदस्थापनेचे आदेश दिले़ सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या २१़७६ कोटी निधीच्या वितरणाच्या संबंधात सदोष निधी वाटपाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याचबरोबर योजनेच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवरुन झालेले संभाषण शासनाची प्रतिमा मलीन करणारे आहे़
लेखणीबंद आंदोलन
केंद्रे यांच्या निलंबनाची माहिती मिळताच निरोप समारंभ रद्द करण्यात आला़ विभागीय आयुक्तांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करीत कर्मचारी संघटनांच्या वतीने जिल्हा परिषदेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे सतीश कावडे यांनी सांगितले.