खळबळजनक!'आपला संकल्प, विकसित भारत' यात्रेतील लाखों रुपयांचे साहित्य उकिरड्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:39 AM2024-01-23T11:39:14+5:302024-01-23T11:57:00+5:30
जनतेच्या पैशांचा अपव्यव कसा होतो याचे उत्तम उदाहरण यातून दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.
- मारोती चिलपिपरे
कंधार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या विकसित भारत, संकल्प यात्रेचे लाखों रुपयांचे साहित्य उकिरड्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. समोवारी सायंकाळी कंधार-घोडज रस्त्यावर या संकल्प यात्रेतील लाखो रुपयांचे साहित्य एका उकिरड्यावर फेकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या या साहित्याचे गठ्ठे थेट उकिरड्यावर दिसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
कंधार तालुक्यात अनेक दिवसांपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन सरकारने केलेल्या कामाची माहिती देत ग्रामस्थांना रथातून चित्रफित दाखविण्यात येते. काही गावात या रथ यात्रेला मराठा आरक्षणामुळे विरोधही झाल्याचे पहावयास मिळाला होता. मात्र, अनेक गावांमध्ये यात्रा यशस्वी पार पडली आहे.
दरम्यान, या शासकीय यात्रेतील माहितीपत्रके, पुस्तिका, पत्रके, कॅलेंडर, बॅनर आदी लाखो रुपयांचे साहित्य सोमवारी सायंकाळी कंधार ते घोडज रस्त्यावर नागरी वस्तीच्या बाजूला चक्क उकिरड्यावर आढळून आले.यातील काही साहित्य जाळून टाकण्यात आले होते. ग्रामस्थांना न वाटताच हे साहित्य उकिरड्यावर फेकून दिल्याने खळबळ उडाली आहे.अनेकांनी यातील कॅलेंडर व इतर साहित्याचे गठ्ठे उचलूनही नेले. जनतेच्या पैशांचा अपव्यव कसा होतो याचे उत्तम उदाहरण यातून दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.