मूळ तक्रार बाजूला ठेवून ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:01+5:302021-08-01T04:18:01+5:30
नांदेड : नायगाव तालुक्यातील मौजे इकळीमाळ येथे गायरान जमिनीवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिकाऱ्यांसोबत काही जणांनी ...
नांदेड : नायगाव तालुक्यातील मौजे इकळीमाळ येथे गायरान जमिनीवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिकाऱ्यांसोबत काही जणांनी वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानुसार शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार देण्यात आली; परंतु तक्रारदाराची मूळ तक्रार बाजूला ठेवून आरोपींवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा नोंदविण्याचा प्रताप कुंटूर पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबत तक्रारदारानेच पोलीस अधीक्षकांकडे आता कुंटूर पोलिसांची तक्रार केली आहे.
ॲट्राॅसिटी हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे ॲट्राॅसिटीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे; परंतु कुंटूर पोलिसांना याचा विसर पडल्याचे दिसून येते. विस्तार अधिकारी शेख मोहम्मद लतीफ मोहम्मद नवाज हे गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा पंचनामा करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी शंकर माधवगीर गिरी, परमेश्वर गिरी यांच्यासह गावातील पाच ते सहा जणांनी वाद घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानुसार शेख मोहम्मद लतीफ यांनी ठाण्यात तक्रार दिली; परंतु पोलिसांनी या प्रकरणात कुठेही जातिवाचक शिवीगाळ झाल्याचा उल्लेख नसताना ॲट्राॅसिटीची कलमे लावण्याचा प्रताप केला. तक्रारदार हस्ताक्षरांत जबाब लिहून देण्यास तयार असताना चार ते पाच वेळेस संगणकावर परस्पर मजकूर तयार करण्यात आला. प्रत्यक्षात तक्रारदाराची तक्रार ही फक्त शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची होती. असे असताना कुंटूर पोलिसांनी ॲट्राॅसिटीसाठी दाखविलेली तत्परता ही नेमकी कोणत्या कारणासाठी होती, हा संशोधनाचा विषय आहे. दरम्यान, तक्रारदार शेख मोहम्मद लतीफ यांनी पोलिसांच्या या कार्यपद्धतीच्या विरोधात पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांकडे तक्रार केली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून या प्रकरणात आता काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
चौकट-
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या हाेत्या सूचना
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये लतीफ यांनी या प्रकरणात शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याची तक्रार देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लतीफ यांनी तक्रार दिली; परंतु पोलिसांनी ॲट्राॅसिटी दाखल करून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे लतीफ हे खुल्या प्रवर्गात येतात. त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून ॲट्राॅसिटी कशी दाखल होते? एवढेही भान गुन्हा दाखल करताना ठेवण्यात आले नाही, याचे आश्चर्य वाटते.
ॲट्राॅसिटीसाठी टाकला दबाव
शासकीय कामात अडथळ्याच्या तक्रारीसाठी गेलो असताना एपीआय निलपत्रेवार यांनी माजी तक्रार बाजूला ठेवून ॲट्राॅसिटीची तक्रार द्या म्हणून दबाव टाकला. असा आरोप लतीफ यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे.