विष्णूपुरीतील पाणीचोरी रोखण्यासाठी ‘संयुक्त पथके स्थापन करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:09 AM2018-05-20T01:09:21+5:302018-05-20T01:09:21+5:30
विष्णूपुरी प्रकल्पातील होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून प्राप्त झालेले पाणी जुलैपर्यंत राखून ठेवण्याची मोठी कसरत महापालिकेला करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून प्राप्त झालेले पाणी जुलैपर्यंत राखून ठेवण्याची मोठी कसरत महापालिकेला करावी लागणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प उरल्यानंतर महापालिकेने लोअर दुधना प्रकल्पातून तब्बल १६६ कि.मी. अंतराहून पाणी घेतले. २५ दलघमी पैकी महापालिकेला अपेक्षित १५ दलघमी पाणी शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत विष्णूपुरीत पोहोचले होते. दुपारनंतर पाण्याचा येवा मंदावला. परिणामी आता उपलब्ध झालेल्या पाण्याचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
आयुक्त माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला विष्णूपुरीतील पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके स्थापन करण्याची सूचना केली आहे. या पथकाद्वारे विष्णूपुरीतील पाणी चोरी रोखण्यात येणार आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत कळवले आहे. आता जिल्हाधिकारी सदर पथक स्थापनेचे आदेश निर्गमित करतील. या पथकात महसूल, सिंचन, पोलीस, महावितरण तसेच महापालिकेच्या कर्मचाºयांचा समावेश राहणार आहे.
विष्णूपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या पाणी उपसा सुरू आहे. हजारो विद्युतपंपाच्या सहाय्याने पाणीपुरवठा उपसा २४ तास सुरू आहे. त्यामुळे मोठ्या परिश्रमातून घेतलेले पाणी जुलैपर्यंत राहील की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या संयुक्त पथक स्थापनेची गरज निर्माण झाली होती.
संयुक्त पथकालाही प्रत्यक्ष प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या पाण्याची चोरी न रोखल्यास आणि पावसाळा लांबल्यास पाण्याचा मोठा प्रश्न शहरापुढे उद्भवणार आहे. हीच बाब लक्षात घेवून मनपाने पावले उचलली आहेत.
---
पाणीपुरवठ्यात महावितरणचा खोडा
शहरात अनियमित पाणी पुरवठ्यासंदर्भात मोठी ओरड सुरू आहे. महापालिकेच्या १६ मे रोजी झालेल्या सभेतही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याबाबत आयुक्तांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तात्काळ नगरसेवकांना पुरवले. मात्र या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात महावितरणचा मोठा अडथळा महापालिकेला सहन करावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरातील जलकुंभ भरण्यात विलंब होत आहे. परिणामी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडत आहे. याबाबत महापालिकेने महावितरणला कळवले आहे.