‘सेवाभावी’ संस्थेचा मराठवाड्यातील २५ लाख लोकांना १०० कोटींचा गंडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:48 AM2023-08-31T01:48:13+5:302023-08-31T06:41:07+5:30
वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड : तीन महिने अकराशे रुपये भरा अन् साडेचार हजार रुपयांचे धान्य घेऊन जा. तसेच, सव्वा लाखाची दुचाकी अवघ्या ३० हजार रुपयांत अशी वेगवेगळी आमिषे दाखवून छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेने नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील जवळपास २५ लाखांवर नागरिकांना तब्बल १०० कोटी रुपयांनी गंडविले आहे. वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
औंढा येथील मूळ रहिवासी बाबासाहेब सुतारे हा या घोटाळ्याचा मास्टरमाइंड आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात जवळपास ७०० एजंट नियुक्त केले होते. यातील प्रत्येक एजंटने जवळपास ३ ते ४ हजार ग्राहक जोडले होते. त्यांच्याकडून तीन महिने ११०० रुपये घ्यायचे आणि साडेचार महिन्यांचे धान्य त्यांना द्यायचे, असा हा फंडा होता. त्यानंतर सव्वा लाख रुपये किमतीची दुचाकी अवघ्या ३० हजार रुपयांत देण्याची स्कीम सुरू करण्यात आली.
सुरुवातीला काही महिने संस्थेकडून धान्य, दुचाकी आणि इतर साहित्य वाटप करण्यात आले. परंतु, त्यानंतर टाळाटाळ सुरू करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार या गुन्ह्यामध्ये आठ आरोपींचा समावेश आहे. परंतु, आरोपींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.