सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून उघडकीला आले सात गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:14 AM2020-12-08T04:14:52+5:302020-12-08T04:14:52+5:30
नांदेड- मागील काही दिवसांत नांदेड शहर आणि परिसरात चेन स्नॅचिंग आणि जबरी चाेरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर ...
नांदेड- मागील काही दिवसांत नांदेड शहर आणि परिसरात चेन स्नॅचिंग आणि जबरी चाेरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तब्बल सात गुन्हे उघडकीस आले असून, सात लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पाच जबरी चाेऱ्यांबरोबरच एका घरफोडीच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. अनलॉकनंतर दसरा, दिवाळी या सणासुदीच्या काळात नांदेड शहरातील शिवाजीनगर, विमानतळ, तसेच भाग्यनगर या भागात चेन स्नॅचिंग आणि जबरी चाेरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढली होती. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक प्रमाेदकुमार शेवाळे आणि अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी सदर गुन्ह्यांचा तपास तातडीने करण्याचे, तसेच यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील रेकॉर्डिंगची मदत घेण्याचे निर्देश दिले होेते. त्यानुसार पाेलीस निरीक्षक नरुटे आणि शिवाजीनगर ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक डोके यांनी कर्मचाऱ्यांसह शहरातील पन्नासहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील रेकॉर्डिंगची तपासणी केली, तसेच चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीवर लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेतले. या मोहिमेंतर्गत ३० नोव्हेंबर रोजी अनिल सुरेश पवार ऊर्फ अनिल पंजाबी याला अटक केली, तर ३ डिसेंबर रोजी शेख आमेर शेख पाशा (रा. सिडको) हा जाळ्यात सापडला. ४ डिसेंबर रोजी चैतन्यनगरमधून सचिन शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे शहरातील चेन स्नॅचिंगच्या घटनांबाबत विचारपूस केली असता चेन स्नॅचिंगच्या पाच जबरी चोऱ्यांचा उलगडा झाला. पोलिसांनी त्याच्याकडून ९०.६३ ग्रॅम सोने, चार मंगळसूत्र व एक नेकलेस, असा ४ लाख ३७ हजार ७४१ रुपयांचा मुद्देमाल, तसेच १ लाख १२ हजार रुपयांची मोटारसायकल, असा एकूण ५ लाख ६९ हजार ७४१ रुपयांचा ऐवज जप्त केला. याबरोबरच २७ नोव्हेंबर रोजी गोपाळ ऊर्फ किशनाला बटावाले यास विष्णूनगर परिसरातून अटक करून त्याच्याकडून १ लाख १ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या आरोपीकडून एक घरफोडीचा व एक मोटारसायकल चोरीचा गुन्हाही उघड झाला आहे.
सदरील बातमीचा फोटो
फोटो नं. ०७एनपीएचडीईसी०१
फोटो कॅप्शन - नांदेडमधील शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पाच जबरी चोऱ्यांचे, घरफोडीचा एक, तर मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आणत ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई करणाऱ्या पथकासोबत पोलीस निरीक्षक ए. एन. नरुटे.