अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा द्या; सोनखेड ग्रामस्थांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:11 IST2020-02-28T12:31:19+5:302020-02-28T13:11:39+5:30
रास्ता रोको आंदोलनामुळे नागपूर- तुळजापूर महामार्ग ठप्प पडलाय.

अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा द्या; सोनखेड ग्रामस्थांचा रास्तारोको
नांदेड: चिमरुडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोनखेड येथील ग्रामस्थांतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात येतय. या रास्ता रोको आंदोलनामुळे नागपूर- तुळजापूर महामार्ग ठप्प पडलाय.
अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी सुग्रीव मोरेला कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. याच मागणीसाठी ग्रामस्थानी रस्ता अडवून धरलाय. दरम्यान, या घटनेनंतर सलग आज तिसऱ्या दिवशी सोनखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. चिमरुडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोनखेडचे ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत. या सर्व घडामोडीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत गावकऱयांना शांतता पाळण्याचे आवाहन केलय.
अपहरण करून अत्याचार केल्याचे प्रकरण
लोहा तालुक्यातील एका गावातील ५ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्या सुग्रीव भुजंगराव मोरे (२८, रा. सोनखेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची ओळखही पटली असून या घटनेप्रकरणी विविध संघटनांनी निषेध करत गुरुवारी लोहा, सोनखेड कडकडीत बंद ठेवला. सिडकोमध्येही बंद पुकारण्यात आला होता. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वर्षीय चिमुकलीला आरोपीने पळवून नेले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी दगडगाव शिवारातील एका शेतात शेतकऱ्यांना सदर चिमुकली आढळली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी रात्रीच आरोपीला सुग्रीव मोरे याला पकडले. पीडित चिमुरडीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जिल्ह्यातील विविध संघटनांनी गुन्हेगारास कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.