शाहू महाराजांनी नवीन विचार पेरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:05 AM2018-11-04T01:05:40+5:302018-11-04T01:07:57+5:30
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानमध्ये अनेक पुरोगामी निर्णय घेताना नवीन विचार पेरले. कोणतेही राज्यकर्ते असो, सर्वांसाठी शाहू महाराजांचे कार्य अनुकरणीय असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.
नांदेड : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानमध्ये अनेक पुरोगामी निर्णय घेताना नवीन विचार पेरले. कोणतेही राज्यकर्ते असो, सर्वांसाठी शाहू महाराजांचे कार्य अनुकरणीय असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.
नांदेडमधील पावडेवाडी नाका परिसरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १२ फुटी उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज, पणतू श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी खा. चव्हाण होते. अध्यक्षीय भाषणात चव्हाण यांनी सांगितले, आज ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश दिला जात आहे. मात्र त्याकाळी शाहू महाराजांनी मुलींच्या शिक्षणावर भर दिला. सामाजिक एकोपा टिकविण्याची भावनाही त्यांनी जोपासली. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. करवीर संस्थानमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी घेतलेले अनेक प्रशासकीय निर्णय आजही परिणामकारक असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या निर्णयांचे दूरगामी परिणाम झाले आहेत. प्रतिगाम्यांचा विरोध न जुमानता त्यांनी काम केले.
राजर्षी शाहू महाराज पुतळ्याच्या जागेसाठी अडचणी आल्या. या अडचणीवर मात करत हा पुतळा पूर्ण झाला आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही जाहीरनाम्यामध्ये हा पुतळा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तो पुतळा आज पूर्ण होत आहे. याचा विशेष आनंद असल्याचे सांगताना त्यांनी महापौर शीला भवरे, आयुक्त लहुराज माळी आणि नगरसेवकांचे अभिनंदन केले. जागेसाठी तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही मंडळींनी त्यांच्या नावाला विरोधही दर्शविला. मात्र त्यांना उत्तर देण्याचे हे ठिकाण नसल्याचे स्पष्ट करताना त्या विषयावर आपण स्वतंत्रपणे बोलू, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारणासाठी २०१९ ची रणभूमी तयारच असल्याचेही ते म्हणाले. आ. राम पाटील यांना शुभेच्छा देत आपल्या सहा वर्षे निवडणुका नसल्याने कामे करायला आपल्याला वेळ आहे. आपल्या कार्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आमदारकी दिली आहे. आपण कोणत्या गटा-तटात नाही, हे यातून स्पष्ट झाले, असे सांगताना भाजपातील गटबाजीबाबतही चिमटा काढला.
यावेळी माजी राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनीही राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य हे कोल्हापूर पुरतेच मर्यादित नव्हते तर संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शाहूंचा पुतळा नांदेडात होणे ही आम्हा कोल्हापूरवासियांसाठीही अभिमानाची बाब आहे. शाहू महाराजांचा समतेचा संदेश मार्गदर्शक असल्याचेही ते म्हणाले.
माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांनीही या पुतळ्याच्या निर्मितीचा आढावा घेताना पालकमंत्री असताना आपण सदर कामाचे भूमिपूजन केल्याचे ते म्हणाले. या जागेसाठी कृषिमंत्री विखे पाटील यांनी मोठी मदत केली आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनीही पुतळा उभारणीसाठी पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा आ. राम पाटील रातोळीकर यांनी राजर्षी शाहूंचा विचार समाजसुधारणेचा होता, असे सांगितले. या शाहूंच्या पुतळ्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेवून काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रभागातील नगरसेविका संगीता पाटील डक यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविकात महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना पुतळा उभारणी संदर्भात माहिती दिली. सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले तर किशोर भवरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपमहापौर विनय गिरडे, नगरसेवक उमेश चव्हाण, बी.बी. गुपिले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील शिंदे, महिला व बालकल्याण सभापती संगीता तुपेकर, उपसभापती अलका शहाणे, नगरसेवक बापूराव गजभारे, दयानंद वाघमारे, किशोर स्वामी, उमेश पवळे, संजय मोरे, डॉ. रेखा चव्हाण, सुमती व्याहाळकर, कार्यकारी अभियंता गिरीष कदम, रत्नाकर वाघमारे, उपअभियंता दिलीप टाकळीकर, उद्यान अधीक्षक डॉ. फरहत उल्ला बेग आदींची उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात प्रा. संतोष देवराये यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर तयार केलेल्या डाक्युमेंट्रीचे विमोचन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. देवराये यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर डाक्युमेंट्री केली आहे.
आम्ही विकासात कधी राजकारण करीत नाही
राजर्षी शाहूंच्या पुतळ्यामुळे नांदेडच्या वैभवात भर पडली आहे. हा भव्यदिव्य पुतळा पाहून शाहू महाराजांची ५६ इंचाची छाती होती. आता ५६ इंचाची छाती कोणाचीही राहिली नाही, असा टोलाही खा. चव्हाणांनी लगावला. मंचावर असलेल्या भाजपाचे आ. राम पाटील रातोळीकर तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून खा. चव्हाण म्हणाले, आज या कार्यक्रमास सर्वपक्षीय मंडळी उपस्थित झाली आहे. महापालिकेने सर्वांना निमंत्रित केले आहे.आम्हाला निमंत्रित केले नसले तरी आम्ही मात्र सर्वांना निमंत्रित करुन विकासात राजकारण करत नसल्याचे सांगितले. सर्वांनी एक पाऊल पुढे टाकत विकासासाठी नेहमीच एकत्र यावे.
आश्वासने दिली तर ती पूर्ण करा- श्रीमंत शाहू
४अलीकडच्या काळात राजकीय नेते भरमसाठ आश्वासने देतात पण ती पाळत नाहीत. यातून जनतेचा भ्रमनिरास होतो. त्यामुळे आश्वासने पाळणे शक्य असतील तरच ती द्यावीत. असा सल्ला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिला. आज मराठवाड्यात विकासाची परिस्थिती काहीअंशी सुधारली असली तरी त्यात मोठा बदल अपेक्षित आहे. राजकारण्यांनी बोलण्याऐवजी कृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आश्वासने दिली तर ती पूर्ण करा, असेही श्रीमंत शाहू महाराज म्हणाले. चव्हाण यांच्या कार्यशैलीबद्दल सांगताना चव्हाण जे बोलतात ते पूर्ण करतात, असेही म्हणाले.