‘ती’ ७ गावे आता अर्धापूर तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:43 AM2018-08-06T00:43:50+5:302018-08-06T00:46:33+5:30
हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर लढाई लढण्यात आली होती़ या लढ्याला यश मिळाले असून या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्धापूर/पार्डी : हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर लढाई लढण्यात आली होती़ या लढ्याला यश मिळाले असून या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़
हदगाव तालुक्यातील वरील सात गावांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ५५ ते ६० किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होते़ यामुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निराधार यांची कामे वेळेवर होत नव्हती़ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तर अर्धापूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने व सर्वच व्यवहार अर्धापूरलाच होत आहेत. यामुळे अर्धापूर तालुका निर्मितीपासून ही सात गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने लढा सुरु ठेवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले़ गावागावांत ग्रामपंचायतसमोरही उपोषणे झाली़ संघर्ष समितीने लढा अधिक तीव्र केल्याने तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे १२ फेब्रुवारी २०१४ ला संघर्ष समितीची बैठक घेऊन सदरील मागणी केली.
या बैठकीस तत्कालीन पालकमंत्री डी़ पी़ सावंत, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. याबाबत शासनाने ३१ जुलै २०१८ ला अधिसूचना जारी केली आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, सचिव दिगंबर मोळके, उपाध्यक्ष राजेश बाजगिरे सल्लागार आनंद भंडारे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष गंगाधरराव पाटील चाभरेकर, माधवराव पाटील चाभरेकर, माजी सभापती दिलीपराव पाटील, नारायण संगेवार, माजी सरपंच संजय मोळके, संजय जाधव, प्रल्हाद काकडे, सरपंच रघुनाथ काकडे, रामेश्वर काकडे, भुजंगराव सीतापराव, अनिल मोळके, बालाजी पन्नासे, विश्वनाथ बिचेवार, बबनराव बोले, कल्याण मोळके, गणपत सोळंके, तारू, माजी सभापती श्रीमती पद्मावती घोरपडे, बंटी राठोड, बालासाहेब देशमुख, सदाशिवराव चाभरेकर, बाबूराव घुमनर, देवराव कांबळे, गोविंद भरकड, प्रकाश लांडगे, रमेश जाधव, शंकर जाधव आदींनी परिश्रम घेतले.
---
अर्धापूरच्या सीमेवर असलेल्या त्या सात गावाला हदगाव ५५ ते ६० कि़मी़ अंतरावर असल्याने शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागत होते़ त्यामुळे हदगाव तालुक्यातील ही सात गावे अर्धापूरला जोडावे, अशी मागणी होती़ ती पूर्ण झाल्याने आम्हाला आनंद होत आहे - राजेश बाजगिरे,
सात गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष