वो मिलती हैं... मगर परवडती नही ! मद्यासह तंबाखु, गुटख्याची सर्रासपणे होतेय विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 01:10 PM2020-05-06T13:10:06+5:302020-05-06T13:18:53+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून २३ मार्च पासून देश लॉकडाऊन करण्यात आला़ लॉकडाऊनच्या या काळात जीवनावश्यक वस्तु सोडल्या तर सर्वच प्रकारच्या विक्रीवर बंधन आले. परंतु, बंदबारीतही दारू कुठे उपलब्ध होते ही बाब तळीरामांना चांगलीच माहिती असते़
- श्रीनिवास भोसले
नांदेड : थकवा घालवायाचा म्हणून लागलेली सवय लॉकडाऊन काळात अडचणीची बनत आहे़ सर्वच प्रकारच्या तंबाखू, गुटख्यासह दारूच्या विक्रीवर बंदी असतानाही सर्रासपणे उपलब्ध होत आहे़ परंतु, शौकिनांना ती चढ्या भावाने परवडत नसल्याने ‘वो मिलती हैं... मगर परवडती नही!’ असे म्हणण्याची वेळ आली आहे़
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून २३ मार्च पासून देश लॉकडाऊन करण्यात आला़ लॉकडाऊनच्या या काळात जीवनावश्यक वस्तु सोडल्या तर सर्वच प्रकारच्या विक्रीवर बंधन आले. परंतु, बंदबारीतही दारू कुठे उपलब्ध होते ही बाब तळीरामांना चांगलीच माहिती असते़ कोणत्याही गावात लग्नकार्य अथवा कोणत्याही निमित्ताने गेल्यानंतर त्यांना दारूंच्या दुकानांचा बरोबर शोध लागतो़ मात्र, यावेळी गावाबाहेर पडणेच अवघड झाल्याने आणि दुकाने बंद असल्याने दररोज दारूचे जुगाड कसे लावायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे़ त्यातही छुप्प्या पद्धतीने दारू उपलब्ध होत आहे़ पण, नियमितपणे चार दोन पैसे जास्तीचे घेवून मद्य विक्री करणारे आज त्यांच्या इच्छेनूसार दर आकारत आहेत़ त्यामुळे तळीरामांची मोठी अडचण निर्माण झाली आहे़
ऐरवी मद्यप्राशन करून आलेला कोणीही मित्रांबरोबर थोडी घेतली, मित्रांनी आग्रह केला म्हणून आज झाली, पार्टी होती नाही म्हणता आलं नाही अशी लाख कारणं सांगतात. पण लॉकडाऊनच्या काळात छुप्या पध्दतीने मिळणाऱ्या मद्याचे दर चौपट वाढले. आपसुकच महागडी दारू पिणे श्रीमंतांनाही आज परवडत नाही़ देशी दारू ५२ ते ५५ रूपयांना मिळणारी आज अडीचशे ते तीनशे रूपयांना मिळत आहे़ तर विदेशी मद्याचेही भाव गगणाला मिळाले़ दिडशे रूपयांत मिळणारे विदेशी मद्य आज पाचशे ते सातशे रूपयांपर्यंत विक्री होत आहे़ त्यामुळे बºयाच तळीरामांनी आपली तलफ भागविण्यासाठी गावठी दारूला पसंती देणे सुरू केल्याने गावठी दारू विक्री करणाºयांचे प्रमाण वाढल्याचे पोलीस कारवाईतून स्पष्ट होत आहे़
किराणा दुकानात मिळतोय गुटखा
काळ्या बाजारात मद्य, सिगरेट, तंबाखु आणि गुटखा यांची छुप्या पध्दतीने विक्री होत आहे. पण याचे दर चांगलेच वाढले आहेत. मद्याच्या ब्रण्डनुसार त्याचे दर ठरवले जात आहेत. मात्र कमीत कमीचा दर हा दोनशे रूपयांचा आहे. तंबाखुच्या एका पुडीने पंचवीस रूपये आकारले जात आहे़ गुटख्याच्या पुढीसाठी चाळीस ते पन्नास रूपये आणि सिगारेट २० रूपयांपासून पुढे विकली जात आहे़ पानटपºया बंद असल्याने ग्रामीण भगाात सर्रासपणे किराणा दुकानांवर प्रतिबंधतिक असलेला गुटखाच काय दारू पण मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़
व्यसन सोडविण्यासाठी चांगला काळ
लॉकडाऊनचा काळ अनेकांचे व्यवसन सोडविण्यासाठी चांगला आहे़ प्रत्येकजण घरातच असल्याने आणि चोरट्या बाजारात मद्यासह तंबाखू, गुटख्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकजणांना ते परवडणारे नाहीत़ त्यामुळे अनेकजण नको रे बाबा़़़ म्हणून व्यसनाकडे दुर्लक्ष करीत आहे़ त्यात मानसिकता सांभाळण्यासाठी अख्ख कुटुंब घरीच असल्याने आधार मिळत आहे़ बरेच जण फोन करून सल्ला मागत आहेत़ योग्य मार्गदर्शनामुळे अनेकांनी आज व्यसन सोडले आहे़ आजच्या वेळेचा सदुपयोग वाचन, गाणी ऐकणे, योगा, प्राणायाम करणे अशा चांगल्या सवयी लावण्यासाठी अनेकजण करीत आहेत़ - डॉ़शिवानंद बासरे, योग प्रशिक्षक तथा आयुर्वेदाचार्य, नांदेड़