येसगी सरपंचपदी शेख सद्दाम चाँदसाब, तर उपसरपंचपदी मधुकर प्रचंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:21+5:302021-02-14T04:17:21+5:30
येसगी (पु.) येथे शनिवारी सरपंच, उपसरपंचांची निवड प्रक्रिया पार पडली. येथील सरपंचपद हे ओबीसी सर्वसाधारण राखीव असल्याने भाजपचे ...
येसगी (पु.) येथे शनिवारी सरपंच, उपसरपंचांची निवड प्रक्रिया पार पडली. येथील सरपंचपद हे ओबीसी सर्वसाधारण राखीव असल्याने भाजपचे शिवकुमार चनपनोर यांच्या पॅनलविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाधर प्रचंड यांच्या ग्रामविकास पॅनलने एकमेकांविरुद्ध दंड थोपटले होते. गंगाधर प्रचंड यांच्या चलाखीने पुनर्वसित येसगी गावातून चार सदस्य बिनविरोध काढण्यात यशस्वी झाले; तर उर्वरित तीन सदस्यांपैकी ओबीसी उमेदवार निवडून येणे जिकिरीचे होते. जुन्या गावात तीन सदस्यांसाठी निवडणुकीची दोन्ही पॅनल प्रतिष्ठेची झाली होती. यातही मतदारांनी गंगाधर प्रचंड यांच्या पॅनलला कौल दिला. यात प्रचंड गटाचे शेख सद्दाम यांच्यासह इतर दोन सदस्य निवडून आले. शिवकुमार चनपनोर यांना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे प्रचंड गटाचे शेख सद्दाम चाँदसाब यांचा एकच अर्ज दाखल करण्यात आला असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली; तर उपसरपंचपदासाठी मधुकर भीमराव प्रचंड यांनी अर्ज दाखल केला होते. यांचाही एकच अर्ज आल्याने यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सातसदस्यीय असलेल्या येसगी ग्रामपंचायतीत प्रचंड पॅनलचे राज आले आहे.
या निवडीच्या वेळी शेख सद्दाम, मधुकर प्रचंड, अशोक प्रचंड, रमाबाई प्रचंड, सविता क्यादरकुंटे, सुनीता सिंदलोन, भाग्यश्री सोळंके असे एकूण सात नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. सरपंच, उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निर्वाचन अधिकारी एम. बी. चव्हाण यांनी केली. या कामी ग्रामसेवक हंबिरे यांनी सहकार्य केले. पोलीस बिट जमादार बोधने, पो. कॉ. मुद्दमवार, बाबूराव गाजुलवाड यांनी बंदोबस्त ठेवला होता.