एसटीचा श्रावणात शिमगा; पगार थकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:24 AM2021-08-17T04:24:51+5:302021-08-17T04:24:51+5:30
नांदेड विभागात जवळपास ९ आगार आहेत. या सर्व आगाराच्या माध्यमातून लांब पल्ल्याच्या प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न महामंडळ करत ...
नांदेड विभागात जवळपास ९ आगार आहेत. या सर्व आगाराच्या माध्यमातून लांब पल्ल्याच्या प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न महामंडळ करत आहे; परंतु प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सुरू केलेल्या काही बसफेऱ्या पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत.
श्रावणापासून विविध सणांना सुरुवात होते. लेकीला सणास आणले तर साडी कशी घ्यायची असा प्रश्न पडतो. त्यामुळे पंचमीला मुलीला आणले नाही. या महिन्याचा पगार अद्यापही झालेला नाही. त्यात कधी मिळेल, याची शाश्वती नाही.
- एस.टी. कर्मचारी
कोरोना काळात आर्थिक फटका बसला. त्यामुळे चार ते सहा महिने पगार झाला नाही. त्यात उसनवारी करून कुटुंबाचा गाडा हाकला; परंतु आत कर्तव्यावर येऊनही वेळेवर पगार मिळत नसल्याने पुन्हा दुसऱ्याकडे हात पसरावे लागत आहेत. - एसटी वाहक
उत्पन्न कमी; खर्च जास्त
कोरोना काळात जवळपास दीड वर्ष एसटी बंदच होती. त्यामुळे नांदेड विभागाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. त्यात मेंटनेंन्सचा खर्च सुरूच होता.
शासनाच्या वतीने कोरोना नियम शिथिल केल्याने अनलॉकमध्ये लांब पल्ल्याच्या तसेच प्रवाशांची गर्दी असलेल्या मार्गावरील बस सुरू केलेल्या आहेत.
सध्या नांदेड विभागाला ४० ते ४२ लाख रुपये दररोजचे उत्पन्न मिळत आहे; परंतु त्यात डिझेल, पगार आणि देखभाल दुरुस्तीचा खर्चही निघणे कठीण होत चालले आहे.
कोरोनानंतर प्रवासी असलेल्या मार्गावर अधिक बस सोडून तसेच मालवाहतूक करून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याचा विभागाचा प्रयत्न राहिला आहे. मागील काळात थकलेले पगार करता आले. वरिष्ठ कार्यालयाकडून रक्कम येताच पगार होतील. - संजय वावळे, विभागीय वाहतूक नियंत्रक, नांदेड.