नांदेडात शिंदे-पवार गटाची ताकद ‘मर्यादित’;‘उद्धव सेने’ची पोकळी अशोकराव भरून काढतील?
By राजेश निस्ताने | Published: April 22, 2024 06:07 PM2024-04-22T18:07:35+5:302024-04-22T18:09:20+5:30
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णत: बिघडली आहेत. कोण कोणासोबत आणि कुणाची ताकद किती व कुठे हे सांगणे कठीण झाले आहे.
लोकसभेच्या नांदेड मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून प्रचारासाठी जोर लावला जात आहे. प्रत्यक्ष मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. दोन्ही बाजूकडून पक्षप्रवेश घडवून आणत पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न होतो आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेची साथ होती. आता शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. त्यातील उद्धव सेनेची पोकळी भाजप आता कशी भरून काढते, याकडे नजरा आहेत. ही पोकळी अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने भरून निघते का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
२०१९ ची लोकसभा निवडणूक भाजप व शिवसेनेने युतीमध्ये लढली होती. त्यावेळी भाजप-सेना युतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर ४ लाख ८६ हजार ८०६ मते घेत विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अशोकराव चव्हाण यांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते मिळाली होती. चिखलीकरांना ४० हजार १४८ मतांची आघाडी मिळाली होती. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव करणारे चिखलीकर ‘जायंट किलर’ ठरले होते. परंतु गेल्या पाच वर्षात राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली, संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. शिवसेना व राष्ट्रवादी फुटली. हे दोन पक्ष सत्तेतही आहेत आणि विरोधी बाकावरही. कदाचित हे देशातील दुर्मिळ उदाहरण असावे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णत: बिघडली आहेत. कोण कोणासोबत आणि कुणाची ताकद किती व कुठे हे सांगणे कठीण झाले आहे.
शिंदे-पवार गटाची ताकद ‘मर्यादित’
यावेळी भाजपच्या नेतृत्वातील महायुतीसोबत शिवसेनेचा शिंदे गट आहे. म्हणायला शिवसेना भाजपसोबत आहे. मात्र शिंदे गटाची जिल्ह्यात नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ वगळता इतरत्र फारशी ताकद नाही. शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांचा मोठा गट महाविकास आघाडीसोबत आहे. मूळ शिवसेनेचे आधीपासूनच शहरीच नव्हे तर ग्रामीण भागात सर्वदूर नेटवर्क आहे. हे बहुतांश नेटवर्क उद्धव सेनेसोबत आहे. शिंदे सेनेच्या नेटवर्कला मर्यादा आहेत. त्यांना हे नेटवर्क वाढविण्यासाठी पुरेसा अवधीच मिळाला नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची अवस्था तर शिंदे सेनेपेक्षाही आणखी वाईट आहे. एकूणच ही निवडणूक भाजपला शिंदे सेना व अजित पवार गटाच्या अगदीच ‘मर्यादित’ ताकदीवर लढावी लागणार आहे. याउलट उद्धव सेनेची ताकद काँग्रेसच्या उमेदवारासोबत राहणार आहे. उद्धव सेनेमुळे निर्माण झालेली ही पोकळी भाजप नेमकी कशी भरून काढणार, त्यासाठी काय पर्याय वापरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तसे पाहता भाजपसोबत आज उद्धव सेना नसली तरी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या रुपाने एक तगडा गट सोबत आहे. उद्धव सेनेची उणीव अशोकरावांचा गट किती प्रमाणात भरून काढू शकतो, यावर भाजपच्या जयपराजयाचे गणित बऱ्याचअंशी अवलंबून राहणार आहे.
प्रतापरावांसाठी अशोकराव गावोगाव
अशोकरावांच्या येण्याने भाजपला मोठे पाठबळ मिळाल्याचे मानले जाते. तर दुसरीकडे समाजातील काही घटकांना अशोकरावांचे पक्षांतर रुचलेले दिसत नाही. एखादवेळी हे पक्षांतर भाजपवर ‘बुमरँग’ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वास्तविक प्रतापरावांच्या विजयासाठी अशोकराव गावोगाव फिरून जिवाचे रान करीत आहेत. कदाचित प्रतापरावांपेक्षा अधिक मेहनत ते घेत आहेत. अशोकरावांमुळेच नांदेड लोकसभेची ही निवडणूक ‘हॉट सीट’ बनली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला, विशेषत: अशोकरावांना या जागेवर विजय हवा आहे. कारण या विजयाचे आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर दूरगामी परिणाम होणार आहे.
वसंतरावांना दाखविला ‘आरसा’
पोकळी भरण्यावरून अशोकराव व काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यात शाब्दिक बाण उडाले. अशोकरावांची पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेसने आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिल्याचा दावा वसंतरावांनी केला. तर वसंतरावांनी २०१९ ला आपल्या नायगाव या ‘गृह’ विधानसभा मतदारसंघात काय स्थिती होती हे आधी बघावे, असे आव्हान देत अशोकरावांनी त्यांना ‘आरसा’ दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यात खरोखर तथ्यही आहे. २०१९ ला नायगाव मतदारसंघात भाजपला तब्बल ९० हजार ८१० तर काँग्रेसला ६९ हजार ९९३ मते मिळाली होती. वंचितने तेथे काँग्रेस उमेदवारांच्या अर्धे अर्थात २६ हजार ९३६ मते घेतली होती. वसंतरावांच्या नायगावात काँग्रेस अर्थात तत्कालीन लोकसभेचे उमेदवार अशोकराव चव्हाण २० हजार ८१७ मतांनी मायनस होते. आपल्या गृह मतदारसंघात आपली काय स्थिती आहे, हे तपासा असा संदेश अशोकरावांनी आव्हानातून वसंतरावांना दिला.
स्थानिक प्रश्न प्रचारातून गायब
लोकसभेच्या या निवडणुकीत भाजपाचे राम मंदिर, ३७० कलम हे मुद्दे बरेच मागे पडले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील मुद्यांवरच ही निवडणूक लढली जात आहे. विरोधी पक्ष काँग्रेसही महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव नसणे यासारख्या स्थानिक मुद्यांवर फोकस करताना दिसत नाही.
भिंगे यांचे चौथे पक्षांतर, कॉँग्रेसला फायदा ?
२०१९ च्या निवडणुकीत १ लाख ६६ हजार मते घेणाऱ्या वंचितच्या प्रा. यशपाल भिंगे यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे हे चौथे पक्षांतर ठरले. मात्र भिंगेंचा काँग्रेसला फायदा किती हे वेळच सांगेल. कारण २०१९ मध्ये दलित समाजातील माता-भगिनींनी आपले अंगावरील दागिने विकून भिंगेंना प्रचारासाठी पैसा दिला होता. मात्र, निवडणुकीनंतर भिंगे यांनी वंचितशी फारकत घेतली. त्यामुळे दलित समाजात भिंगेंबाबत नाराजी आहे. भिंगेंच्या येण्याने मुखेड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर यांना एक नवा ‘स्पर्धक’ तयार झाल्याचेही मानले जाते. खुद्द अशोकरावांनी याबाबतची ‘चिंता’ बोलून दाखवली आहे. सध्या भाजपा व काँग्रेससाठी ‘फिफ्टी-फिफ्टी’ वातावरण आहे. या आठवड्यात मोठ्या स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. त्यानंतर हे वातावरण कुणाच्या बाजूने झुकते हे पाहावे लागेल. मात्र, तयार वातावरण मतदानाच्या दिवसापर्यंत कायम ठेवण्याचे आव्हानही उमेदवार व त्यांच्या पक्षापुढे राहणार आहे.
म्हणे, माझ्या विजयात वंचित कसे?
२०१९ ला माझ्या विजयात वंचितचा ‘वाटा’ होता, ही बाब मान्य करायला प्रतापराव चिखलीकर तयार नाहीत. धनगर-हटकर समाजाची मते भाजपाची हक्काची असतात. ती त्यावेळी वंचितच्या भिंगेंना मिळाली. मात्र यावेळी ती पुन्हा भाजपाकडे परत येतील, असा दावा गेल्याच आठवड्यात प्रतापरावांनी केला होता. मात्र दोनच दिवसांपूर्वी भिंगे काँग्रेसमध्ये गेल्याने ही मते यावेळीसुद्धा भाजपाला मिळतील काय? याबाबत साशंकता आहे. भिंगेंमुळे ती काही प्रमाणात काँग्रेसकडेही वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मग, मराठा समाज कुणाकडे ?
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाची महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कुणाशीही सलगी नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना विरोध केला जात आहे. त्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना अधिक प्रमाणात या रोषाला सामोरे जावे लागत आहे. जरांगेंच्या आवाहनानुसार, महायुती व महाविकास आघाडी यांच्याशी समांतर अंतर राखणारे मराठा समाजबांधव आपले मत नेमके कुणाच्या पारड्यात टाकणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.