'माझी वसुंधरा' अभियानात शिराढोण ग्रामपंचायत मराठवाड्यात अव्वल, ५० लाखांचे पारितोषिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 07:41 PM2024-09-28T19:41:27+5:302024-09-28T19:41:41+5:30
या अभियानांतर्गत गेली वर्षभर ग्रामपंचायतीने गावात विविध उपक्रम राबविले होते.
- मारोती चिलपिपरे
कंधार : शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित राबविण्यात येत असलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानामध्ये ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावात छत्रपती संभाजीनगर विभागातून कंधार तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायत पहिली आली आहे. ५० लाखाच्या बक्षीसास पात्र झाली आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसगांशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाले. माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४ मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्वानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावात छत्रपती संभाजीनगर विभागातून कंधार तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायत पहिली आली आहे. ५० लाखाच्या बक्षीसास पात्र झाली आहे.
ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ४ मध्ये भाग घेतला होता. या अभियानांतर्गत गेली वर्षभर ग्रामपंचायतीने गावात विविध उपक्रम राबविले होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक निर्मुलन, कचरा संकलन, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन, वनराई बंधारे बांधणे, प्रदूषण मुक्त गाव, सोलार योजना आदी उपक्रम राबविले होते. शुक्रवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावात गावाचा छत्रपती संभाजी विभागातून शिराढोण ग्राम पंचायतचा पहिला क्रमांक आला. ५० लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेचा निकाल समजताच सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ तसेच यासाठी परीश्रम घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. या निवडीबद्दल अनेक स्तरातून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.
सर्वांच्या परिश्रमाने यश मिळाले
गेली वर्षभर गावातील सर्व कमिट्या, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद, खाजगी शाळा या सर्वांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यश मिळाले आहे. ग्रामस्थांनीही चांगले सहकार्य केल्यामुळे छत्रपती संभाजी नगर विभागातून पहिला येण्याचा मान मिळाला.
- खुशाल माधवराव पांडागळे, सरपंच शिराढोण