नांदेडमध्ये २६ जानेवारीपासून चार ठिकाणी मिळणार शिवभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 07:40 PM2020-01-24T19:40:33+5:302020-01-24T19:41:31+5:30
या योजनेचा शुभारंभ पालक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
नांदेड : विधानसभा निवडणूकीपूर्वी शिवसेनेने गरीब व गरजू नागरिकांसाठी दहा रुपयात थाळी देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार येत्या २६ जानेवारी पासून नांदेड शहरात ही बहुचर्चीत योजना सुरु होणार आहे. यासाठी शहरातील सर्वाधिक वर्दळीची चार ठिकाणी निश्चित करण्यात आली असून या चारही ठिकाणी प्रत्येकी सव्वाशे लाभार्थ्यांना दररोज दहा रुपयात जेवणाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा शुभारंभ पालक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
महाविकास आघाडीने आता निवडणूकपुर्व दिलेल्या अश्वासनांची पुर्तता करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शिवभोजन थाळी ही योजना आगामी तीन महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर राबविण्यास रविवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. ही थाळी नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकानजीक, रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चार, विष्णूपुरी येथील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयासमोर आणि नवा मोंढा येथील एस.बी.आय. बँके समोर अशा चार ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत या चारही ठिकाणी दररोज प्रत्येकी सव्वाशे लाभार्थ्यांना शिवभोजनाचा लाभ दिला जाणार आहे. बोगस लाभार्थ्यांची नावे घुसडली जावू नयेत यासाठी दक्षता म्हणून लाभार्थ्याचा फोटो आणि मोबाईल क्रमांक अॅपमध्ये घेण्यात येणार आहे. सदर योजना राबविणाºया भोजनालयांना स्वच्छतेसाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत. योजना राबविल्या जाणाºया भोजनालयात एका वेळी २५ नागरिकांना जेवता येईल अशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून या थाळीचे जेवण पार्सल करता येणार नाही.
४१० ग्रॅम पदार्थ मिळणार
शासनाकडून प्रति थाळी ४० रु. भोजनालयास देण्यात येणार असून यामाध्यमातून सदर भोजनालयात दहा रुपयात ही थाळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या थाळीमध्ये दोन चपाती (प्रत्येकी ३० ग्रॅम), एक वाटी भात (१५० ग्रॅम), एक वाटी वरण (१०० ग्रॅम), भाजी १०० ग्रॅम असे ४१० ग्रॅम वजनाचे जेवण गरजूंना देण्यात येणार आहे.