शिवसेना संभ्रमावस्थेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:32 AM2017-07-21T00:32:29+5:302017-07-21T00:33:43+5:30
नांदेड : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या प्रमुख पक्षासह अन्य लहान-सहान पक्ष तयारीला लागले असले
अनुराग पोवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या प्रमुख पक्षासह अन्य लहान-सहान पक्ष तयारीला लागले असले तरी शिवसेना मात्र अजूनही संभ्रमावस्थेतच आहे. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी पक्षाने इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवण्यास प्रारंभ केला आहे. सेनेचे महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र अजूनही ‘वरुन’ कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगत आहेत.
१० जुलै रोजी महापालिकेची आरक्षण सोडत झाली. त्यानंतर १४ जुलै पासून काँग्रेसने, १५ जुलै पासून भाजपाने आणि १९ जुलै पासून राष्ट्रवादीने इच्छु्रांची अर्ज मागवले आहेत. या पक्षांच्या बैठकाही सुरू आहेत. दुसरीकडे शिवसेनेत मात्र शांतताच आहे. १० जुलै रोजी जिल्हा बँकेपुढे ढोल वाजवा आंदोलन झाल्यानंतर तिथेच नगरसेवकांची बैठक घेतली. ही बैठक लोहा-कंधारचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस आ़ हेमंत पाटील हेही उपस्थित होते. या बैठकीत नगरसेवकांनी आमच्या जागा सोडून अन्य ठिकाणी युती केल्यास हरकत नाही, असे मत मांडले होते. दक्षिणचे आ़ हेमंत पाटील यांनीही भाजपासोबत युती करण्यास सेना सकारात्मक असल्याचे सांगितले होते. या बैठकीस सेनेचे महानगराध्यक्ष अनुपस्थित होते. सेनेने युती संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असली तरीही भाजपाने मात्र त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. सेनेची ही बैठक वगळता निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही घडामोडी सुरू झाल्या नाहीत. उलट सेनेतील ९ ते १० नगरसेवक भाजपाच्या गळाला लागले असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. शिवसेनेसह काँग्रेसचेही नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेला निवडणुकीसंदर्भाने अद्याप वरुन कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे महानगराध्यक्ष महेश खोमणे यांनी मात्र सेनेची पूर्ण तयारी असल्याचे सांगितले. पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी बैठका घेतल्याचेही ते म्हणाले. परंतु या बैठका आरक्षण सोडतीपूर्वी घेतल्या होत्या़