शिवसेना खा. हेमंत पाटील यांचा शिंदे गटाशी घरोबा! घर, बँकेसमोर तगडा पोलीस बंदोबस्त
By श्रीनिवास भोसले | Published: July 19, 2022 05:20 AM2022-07-19T05:20:41+5:302022-07-19T05:22:09+5:30
शिंदे गटात प्रवेश केला तर निश्चितच शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांचे राजकीय गुरू हेमंत पाटील हेच आहेत, यावर शिक्कामोर्तब होईल.
नांदेड : महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचा शिंदे गट फुटल्यानंतर बहुतांश आमदार नॉट रिचेबल झाले होते. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांचा समावेश होता. आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात राज्यातील काही खासदार सहभागी होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. त्यामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले. त्यात नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांचा समावेश असून ते खा. हेमंत पाटील यांच्या सल्ल्याशिवाय जाणार नाहीत, अशा चर्चा त्यावेळी होत्या. परंतु, नांदेडात आयोजित एका कार्यक्रमात खा.पाटील यांनी कल्याणकर यांच्या बंडखोरीमागे अदृष्य शक्ती म्हणून आपण आहोत, अशा चर्चा असून त्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत खासदारांची बैठक बोलावली. त्यास खा.पाटील उपस्थित नव्हते. त्यावेळीदेखील त्यांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. परंतु, खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ मुंबईत मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे पुरावे म्हणून थेट त्यांच्यासोबतचे फोटो आणि सहीचे पत्र सोशल मिडियावर प्रसिद्ध केले. दरम्यान, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्यावरून पुन्हा खा.हेमंत पाटील यांच्याविषयी संशय कल्लोळ निर्माण झाला होता. त्यातच सोमवारी रात्री अचानक खा.पाटील यांच्या नांदेड येथील घरासमोर आणि गोदावरी अर्बन बँकेसमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे पाटील हे दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळत आहे. परंतु आजही पाटील यांचे समर्थक हेमंत पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचा दावा करत आहेत.
राजकीय भूमिका मी स्वत: स्पष्ट करणार- पाटील
जय महाराष्ट्र...सध्या मी राष्ट्रपतीपदाच्या मतदानाकरिता दिल्लीत आहे. मी अजुनही शिवसेनेत असून माझी राजकीय भूमिका काय आहे हे मी स्वत: जाहीर करेल. इतर कुणीही कुठल्याही प्रकारच्या बातम्या समाज माध्यमांवर फिरवू नये, ही नम्र विनंती, अशा आशयाची खासदार पाटील यांची पोस्टदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर निश्चितच शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांचे राजकीय गुरू हेमंत पाटील हेच आहेत, यावर शिक्कामोर्तब होईल.
स्वीय सहाय्यकांशीही संपर्क होईना
खासदार हेमंत पाटील हे मंगळवारी दिल्लीत शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना खुद्द हेमंत पाटील अथवा त्यांच्या एकाही स्वीय सहाय्यकांना सोमवारी संपर्क होवू शकला नाही. आमदार कल्याणकर नाॅटरिचेबल झाल्यानंतर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.