गौप्यस्फोट... "निवडणुकीवेळी पक्षाने 1.5 कोटी दिले, तरीही कल्याणकर गद्दार झाले"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 09:18 PM2022-07-03T21:18:36+5:302022-07-03T21:19:22+5:30
'पक्षाने निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी केला आहे
नांदेड - राज्यात शिवसेना आमदारांनी मोठ्या संख्येनं बंडखोरी केल्यामुळे आता ज्या ज्या मतदारसंघात ही बंडखोरी झाली आहे, तेथे पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही बैठका आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत संपर्क वाढवला आहे. नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही शिंदेगटात सहभागी होत शिवसेनेशी फारकत घेतली. त्यामुळे, नांदेडमधील शिवसेना नेत्यांनी आज मेळावा घेतला. त्यावेळी, बालाजी कल्याणकर यांच्यावर जोरदार टिकाही करण्यात आली आहे.
'पक्षाने निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी केला आहे. नांदेडमध्ये आज शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव आणि शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. सध्या राज्यात पसरलेली राजकीय अस्थिरता यात शिवसैनिकांत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जगणाऱ्या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून जिंकून दाखवायचे आणि गद्दारांना धडा शिकवायचा असल्याचे मत यावेळी संपर्कप्रमुख आनंद जाधव आणि खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी आपण उध्दव ठाकरे यांच्याच पाठिशी राहण्याचा निश्चय बोलून दाखवला.