नांदेड येथून शिवशाही केवळ हैदराबादला; प्रशासनाचा पुणे, मुंबईकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:10 PM2018-01-24T18:10:52+5:302018-01-24T18:13:31+5:30

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून शिवशाही बससेवा सुरू झाली आहे़ परंतु, पुणे, मुंबई आणि नागपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी असताना शिवशाही हैदराबादकडे वळविण्यात आली़ पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावत असताना रेल्वे प्रशासनाने नव्याने गाडी सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले़

Shivsahi only from Hyderabad to Nanded; administration mislead to start Pune, Mumbai bus | नांदेड येथून शिवशाही केवळ हैदराबादला; प्रशासनाचा पुणे, मुंबईकडे कानाडोळा

नांदेड येथून शिवशाही केवळ हैदराबादला; प्रशासनाचा पुणे, मुंबईकडे कानाडोळा

googlenewsNext

नांदेड : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून शिवशाही बससेवा सुरू झाली आहे़ परंतु, पुणे, मुंबई आणि नागपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी असताना शिवशाही हैदराबादकडे वळविण्यात आली़ पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावत असताना रेल्वे प्रशासनाने नव्याने गाडी सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले़ त्याचप्रमाणे एसटी प्रशासनानेदेखील पुणे, मुंबई मार्गाकडे कानाडोळा केला आहे़ हैदराबादकडे शिवशाही सोडण्यात काही अधिकार्‍यांचे खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत असलेले हितसंबंध कारणीभूत असल्याची चर्चा महामंडळात होत आहे़ 

नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने रात्रीला धावणारी नांदेड-पुणे, पूर्णा-अंजनी (नागपूर) एक्स्प्रेस बंद करून खासगी ट्रॅव्हल्सच्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा करून दिला़ रेल्वेच्या पावलावर पाऊल ठेवत एसटीच्या अधिकार्‍यांनी  नांदेड येथून पुणे, मुंबई, नागपूर, लातूर मार्गावर शिवशाही सोडण्याकडे दुर्लक्ष केले़ नांदेड विभागाला मिळालेल्या सहाला सहा शिवशाही बस प्रवासी नसलेल्या हैदराबाद मार्गावर सोडण्यात येत आहेत़ 

नांदेड येथून पुणे, नागपूर, मुंबईसाठी रात्रीच्या वेळेला स्वतंत्र रेल्वे नसल्याने या मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावतात़ रेल्वेसाठी मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीसह अनेक संघटना, कार्यकर्त्यांनी आंदोलनेदेखील केली़ परंतु, रेल्वे अधिकारी आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने मुंबई, पुण्यासाठी नांदेडातून रेल्वे सुरू केली जात नसल्याचा आरोप  खासदारांनी रेल्वे महाप्रबंधकांच्या बैठकीत केला होता़  

नांदेडातून हैदराबाद जाण्यासाठी अनेक रेल्वेसह विमानसेवादेखील उपलब्ध आहे़ शिवशाहीच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट अत्यल्प असल्याने आणि रेल्व प्रवास  सुरक्षित असल्याने बहुतांश प्रवासी रेल्वेनेच प्रवास करतात़ मागणी नसताना एसटी अधिकार्‍यांनी शिवशाही हैदराबादकडे वळविली़ त्यामुळे रेल्वे अधिकार्‍यांप्रमाणे एसटी अधिकार्‍यांचे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी अर्थपूर्ण संबंध तर नाहीत ना, असा प्रश्न इंटकचे विभागीय सचिव पी़आऱइंगळे यांनी उपस्थित केला आहे़ भाडेतत्त्वावर घेतलेल्या सहा शिवशाही गाड्या नांदेड विभागाला दिल्या़ २२ जानेवारी रोजी उद्घाटनानंतर मार्गस्थ झालेल्या गाड्यांना तेलंगणा चेक पोस्टवर अडविले. दरम्यान, काही तासानंतर एसटी अधिकार्‍यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून निजामाबाद आरटीओंकडून परवानगी घेतती़ परंतु, यात भरपूर वेळ गेल्याने सकाळच्या गाड्या बिलोली ते हैदराबाद रद्द करण्यात आल्या़ मात्र, सायंकाळी सोडण्यात येणार्‍या तीनही गाड्या हैदराबादपर्यंत धावल्या़

शिवशाही गाड्या येऊनही पुणे-मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांचे हाल सुरुच आहेत़ या मार्गावर मोजक्याच रेल्वे धावतात़ त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांशिवाय पर्याय राहत नाही़ खाजगी ट्रॅव्हल्ससोबत स्पर्धा करण्यासाठी पुणे-मुंबईसाठी शिवशाही सोडण्याची मागणी आहे.
नांदेड येथून पुण्यासाठी सकाळी सहा वाजता केवळ एकच बस धावते़ त्या बसला चांगला प्रतिसाद आहे़ नांदेड येथून पुणे, मुंबई जाणार्‍यांची संख्या अधिक आहे़ परंतु, हा विचार न करता हैदराबादसाठी शिवशाही सोडल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत़
नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयाने शिवशाही बससेवेचे नांदेड - हैदराबाद तिकिट ४९५ रूपये निर्धारित केले आहे़ नांदेड ते हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वेचे एसटी थ्री टायरचे तिकीटदेखील ४९५ रूपये आहे़ परंतु, स्लीपर कोचचे १९० रूपये तर पॅसेंजर गाडीने केवळ १३० रूपयांत हैदराबादला पोहोचतात़ एसटीचा प्रवास दगदगीचा असल्याने प्रवासी रेल्वेलाच पसंती देतात.

Web Title: Shivsahi only from Hyderabad to Nanded; administration mislead to start Pune, Mumbai bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.