प्लॅस्टिक बंदी विरोधात हिरोगीरी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:22 AM2018-06-28T11:22:57+5:302018-06-28T11:27:44+5:30
राज्यात लागू झालेल्या प्लस्टिक बंदीला विरोध करणे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला चांगलच महागात पडलं.
नांदेड : राज्यात लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीला विरोध करणे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला चांगलच महागात पडलं. एका दूध विक्रेत्याजवळ प्लॅस्टिक आढळल्याने दंड आकारणा-या पालिका कर्मचा-याला दमदाटी करणा-या या कार्यकर्त्याला नांदेड पोलिसांनी लॉकअपची हवा दाखवली. आपल्या या कृतीचा व्हिडीओ शूट करून त्याने सोशियल मीडियावर व्हायरल केला, पण याच व्हिडीओमुळे महापालिका आयुक्तांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
प्लॅस्टिक बंदीवरील कारवाई करताना मंगळवारी मनापा कर्मचाऱ्यांना शहरातील पीर बुऱ्हाणनगर येथे एका दूध विक्रेत्याजवळ बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या आढळल्या. पालिका कर्मचा-याने नियमानुसार त्याला पाच हजाराचा दंड आकारला. पण या ठिकोणी हिरोगीरी करण्यासाठी शिवसेनेचे काही कार्यकर्ते धावून आले. यावेळी शेख अफजल या कार्यकर्त्याने पालिका कर्मचा-या कडील पावती पुस्तक फेकून देत भर बाजारात या कर्मचा-याला दमदाटी केली. हा सर्व प्रकार त्याच्या समर्थकाने मोबाईलमध्ये शूट केला. यानंतर शेख अफजल याने हा व्हिडीओ आपल्या फेसबुकवरून व्हायरल केला.
हा व्हिडीओ व्हायरल होताच महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी या प्रकारची गांभीर्याने दखल घेतली. कर्मचाऱ्याला दमदाटी करणाऱ्या शेख अफजल विरोधात बुधवारी सायंकाळी भाग्यनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी लागू केलेल्या प्लॅस्टिक बंदीला विरोध करणे शिवसेनेच्याच कार्यकर्त्याला चांगलच महागत पडलं असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे.