सेना गद्दारांचं श्राद्ध घालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:51 PM2017-09-15T19:51:01+5:302017-09-15T19:54:48+5:30
सध्या पितृपक्ष सुरु आहे़ त्यामुळे अनेकांकडून श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम सुरु असून शिवसेनाही गद्दारांचं जिवंतपणी श्राद्ध घालणार असल्याची घणाघाती टीका पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी चिखलीकरांचे नाव न घेता केली़
नांदेड : सध्या पितृपक्ष सुरु आहे़ त्यामुळे अनेकांकडून श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम सुरु असून शिवसेनाही गद्दारांचं जिवंतपणी श्राद्ध घालणार असल्याची घणाघाती टीका पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी चिखलीकरांचे नाव न घेता केली़
मनपा निवडणुकीत चिखलवाडी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच उद्घाटन खोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी आले़ खोतकर म्हणाले, देशात सध्या वेगळ्या पद्धतीचा कारभार सुरु आहे़ आम्हीच या देशाचे तारणहार आहोत या आविर्भावात काही मंडळी वावरत आहेत़ ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे़ त्यांना बुलेट ट्रेनची स्वप्ने दाखविली जात आहेत़ नोटाबंदी हे पैसा कमावण्याचे षड्यंत्र होते़ भाजपकडून नगरसेवकांना २५ लाख देण्याचे आमिष दाखविले जात आहे़ त्यातून गद्दारांची फौज निर्माण करण्याचे काम होत आहे़ परंतु गद्दारांचे श्राद्ध कसे घालायचे हे शिवसेनेला चांगले माहीत आहे, असेही खोतकर म्हणाले़ नांदेडातच आयुक्तालय झाले पाहिजे अशी सेनेची भूमिका असून कुणाशी युती करायची अन् कुणाशी आघाडी हा निर्णय नंतर घेऊ, परंतु त्यासाठी महापौर हा शिवसेनेचा राहील ही अट राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़
तत्पूर्वी संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनीही चिखलीकरांवर सडकून टीका केली़ आ़ हेमंत पाटील म्हणाले, सध्या शहरात बॅनरबाजी सुरु आहे़ सेना प्रचारात मागे आहे, असा अपप्रचारही केला जात आहे़ त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही़ काही स्वयंघोषित नेते पक्ष बदलत असतील, परंतु त्यामुळे फारसा फरक पडत नाही़ सेनेला आयाराम-गयारामांची गरज नाही़ त्यांना तिकिटेही दिली जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले़ यावेळी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी निलंगेकरांवर टीका केली. नांदेडचे आयुक्तालय त्यांनीच रोखले़ त्यानंतर नांदेड-मुंबई गाडीला विरोध करुन ती बीदरला नेली़ आता मनपा निवडणुकीत कमळाबाई लक्ष्मीबाईच्या जिवावर उड्या मारत आहे़ एकीकडे काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारी भाजप काँग्रेसयुक्त झाली आहे, असे ते म्हणाले.
ज्या तंबूत घुसतो, तो तंबूच घेऊन पळतो
य्अॅड़ मुक्तेश्वर धोंडगे यांनीही चिखलीकरांवर तोफ डागली़ ते म्हणाले, आर्थिक शाखेने मेहुण्यावर टाच आणली़ त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी चिखलीकरांनी भाजपपुढे लोटांगण घातले आहे़ मेहुण्याची काळजी त्यांना होणे स्वाभाविक आहे़ यापूर्वी अशोकराव, विलासराव यांच्याही तंबूत ते घुसले होते़ परंतु ज्या तंबूत ते घुसले, तो तंबूच घेऊन पळण्याची त्यांची परंपरा आहे़ तंबूत पळाले असले तरी, सेनेचा तंबू मात्र जागेवरच आहे़