प्राण्यांसाठीच्या कुंपणाचा शॉक लागून पिता-पुत्राचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:02 PM2019-09-04T14:02:49+5:302019-09-04T14:04:01+5:30
शेतकऱ्याने शेताभोवती विद्युत वाहक तारेचे कुंपण केले होते.
बिलोली (जि. नांदेड) : जंगली प्राण्याच्या उपद्रवापासून मुगाचे संरक्षण करण्यासाठी शेताभोवती टाकलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना बिलोली तालुक्यातील बामणी शिवारात ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. रजनीकांत रामराव गेटकेवार (४०) व विजय रजनीकांत गेटकेवार (१६) अशी मृतांची नावे आहेत.
बामणी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवारात हरीण, रानडुक्कर, वानर आदी प्राण्यांचा हैदोस वाढल्याने त्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी संजय लक्ष्मण गेटकेवार या शेतकऱ्याने शेताभोवती विद्युत वाहक तारेचे कुंपण केले होते. या कुंपणाचा शॉक लागून उपरोक्त दोघांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बिलोलीचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, बीट जमादार संतोष शिंदे, शेख इरफान यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान गेटकेवार कुटुंबियांवर कोसळलेल्या या प्रसंगामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.