खळबळजनक! चौथीतील विद्यार्थिनीची शासकीय हॉस्टेलमध्ये आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 02:36 PM2022-12-13T14:36:05+5:302022-12-13T14:36:24+5:30
किनवटच्या प्रकल्प अधिकारी नेहा भोसले यांनी रात्री बंद खोलीत एक तासभर मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक यांचा खरपूस समाचार घेतल्याची माहिती आहे.
मनाठा (नांदेड): केदारगुडा येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेच्या वस्तीगृहात एका १० वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विश्रांती ऊर्फ राजधानी बालू देशमुखे असे मृत मुलीचे नाव आहे. निवासी आश्रम शाळेत चवथी वर्गात शिक्षण घेत होती.
केदारगुडा येथे पहिली ते दहावीपर्यंत निवासी शासकीय आदिवासी आश्रम शाळा आहे. येथे चौथीच्या वर्गात विश्रांती ऊर्फ राजधानी बालू देशमुखे (१०) शिक्षण घेते. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान विश्रांती वस्तीगृहाच्या खोलीत गेली. दरवाजा बंद करून विश्रातीने पलंगाला ओढणी बांधून गळफास घेतला.
दरम्यान, याच ठिकाणी राहणाऱ्या तिच्या दोन बहिणी खोलीकडे आल्या. यावेळी तिने आतून काही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता विश्रांतीने गळफास घेतलेले दिसून आले. दोघींनी वार्डन छाया खंदारे यांना ही माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापक एच.डी. फुलवलर व इतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तोपर्यंत विश्रांती मृत झाली होती. माहिती मिळताच सपोनी विनोद चव्हाण, वाघमारे, वडजे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला.
घटनेची माहिती सोशल मिडियावरून व्हायरल झाली. मृत मुलीच्या पालक आणि नातेवाईकांनी आश्रम शाळेकडे धाव घेतली. अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी देखील दाखल झाले. संतप्त जमावाने पोलीस प्रशासन व शालेय समितीला धारेवर धरले. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत उच्चस्तरीय तपासाची मागणी करत मृतदेह शवविच्छेदनास देण्यास नकार दिला. इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मृतदेह देण्यात आला. दरम्यान, किनवटच्या प्रकल्प अधिकारी नेहा भोसले यांनी रात्री बंद खोलीत एक तासभर मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक यांचा खरपूस समाचार घेतल्याची माहिती आहे.