धक्कादायक ! किनवटमध्ये त्याच शेतात आणखी एका बिबट्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:02 PM2020-04-18T21:02:07+5:302020-04-18T21:03:40+5:30
तीन दिवसांपूर्वीही सापडला होता मृत बिबट्या
किनवट (जि. नांदेड) : तालुक्यातील तल्लारी-झळकवाडी जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू शेळके यांच्याच शेतात शनिवारी आणखी एका बिबट्याचा मृतदेह आढळल्यान खळबळ उडाली आहे. वनविकास महामंडळाच्या अधिका-यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत शवविच्छेदन केले. अधिका-यांनी विषप्रयोगाचा अंदाज व्यक्त केला असला तरी, बिबट्याच्यामृत्यूचे नेमके कारण अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. तीन दिवसांपूर्वी याच शेताच बिबट्याचा मृतदेह आढळला होता.
किनवट तालुक्यातील तल्लारी व झळकवाडी जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू शेळके यांच्या शेतात १५ एप्रिल रोजी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. किनवट वनविकास महामंडळाच्या अधिका-यांनी त्याचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून अंत्यविधी केला होता. या घटनेला तीन दिवस उलटले नाहीत तोच शनिवारी आणखी एका बिबट्याचा मृतदेह त्याच शेतात आढळला. प्रथम मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या ठिकाणापासून पन्नास फूट अंतरावर या दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत या घटनेची माहिती तातडीने नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांना दिली. त्यानंतर ठाकरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ व्ही.एल. बिराजदार, डॉ़ अजय शिवणकर, डॉ़ ओमप्रकाश शिंदे, एस़ एऩ मिराशे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.
कुत्र्याचाही मृतदेह
या बिबट्यावर विषप्रयोग केला असावा, अशी शंका वर्तवली जात असून, परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तपास करण्याच्या सूचना उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एस. एच. वाजे व वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. गीते यांना दिल्या. मृत बिबट्यापासून काही अंतरावर एका कुत्र्याचाही मृतदेह आढळून आला आहे़ त्याचाही नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ व्ही.एल. बिराजदार यांनी सांगितले.
तीन महिन्यांपूर्वीही दोन बिबटे मृतावस्थेत आढळले होते. किनवट वनविकास महामंडळाच्या जंगलात कमठाला व सिरमेटी शिवारात तीन महिन्यांपूर्वी दोन बिबटे मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे वनविकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या या जंगलात शिकार करणारी टोळी तर नाही ना, असा प्रश्नही उपस्थित जात आहे.
दात-नखे जागेवरच
वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. गीते यांनी मृत बिबट्याचे दात, नखे तसेच इतर अवयव घटनास्थळी ‘जैसे थे’ आढळून आल्याचे सांगितले.